![]()
विभागीय आयुक्त कार्यालयासह तिवसा, चांदूर बाजार, मोर्शी, भातकुली व चांदूर रेल्वे येथे कार्यरत काही कर्मचाऱ्यांनी खोट्या मानीव दिनांकाचा आधार घेत पदोन्नती मिळविल्या. एवढेच नव्हे तर आर्थिक लाभही लाटले. ही चूक लक्षात आणून देत हे प्रकरण पुढे न्यायालयात गेले. दरम्यान न्यायालयाने फटकारल्यानंतरही महसूल प्रशासनाने संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली नाही. त्यामुळे निवृत्त महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले असून आगामी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी हे आंदोलन होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष नंदू बुटे यांनी स्पष्ट केले. महसूल खात्यातील पदोन्नतीचा हा घोटाळा सन २०१६-१७ चा आहे. तत्कालीन विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या मानीव दिनांकांना मंजुरी दिली होती. ही मंजुरी देताना ज्येष्ठता यादीतील इतर कर्मचाऱ्यांना डावलले गेले. त्या कर्मचाऱ्यांनी त्याचवेळी ही बाब लक्षात आणून दिली. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. शेवटी ज्या कर्मचाऱ्यांना डावलले गेले, त्यांनी प्रशासकीय लवादाकडे (मॅट) हे प्रकरण वर्ग केले. दरम्यानच्या काळात न्यायालयातही धाव घेतली. पुढे ५ सप्टेंबर २०२० रोजी लवादाने तर २ एप्रिल २०२५ रोजी न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला. परंतु दोन्ही यंत्रणांनी चौकशीअंती दिलेले कारवाईचे निर्देश विभागीय आयुक्त ते जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी ते मोर्शी, तिवसा, चांदूर बाजार, भातकुली व चांदूर रेल्वेचे तहसीलदार-एसडीओ यांच्यादरम्यानच फिरत असल्याचा बुटे यांचा आरोप आहे. शेवटी उद्वेगाने त्यांनी १५ ऑगस्टला आंदोलन तर सप्टेबरमध्ये न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची घोषणा केली. यावेळी सेवानिवृत्त महसूल कर्मचारी असोसीएशनचे पदाधिकारी विजय सावरकर, भास्कर रिठे, सुरेशराव शिर्के, किशोर पोहनकर, एस.डी. कपाळे, गजानन हातगावकर, भोजराज वाघमारे, जीवन देशमुख, कैलास बोरकर आदी उपस्थित होते. चौकशी सुरु, आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न ^तक्रारीतील मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी सुरु आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर खोट्या मानीव दिनांकांचा आधार घेतल्याचा आरोप आहे, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटी केली आहे. त्यामुळे माहिती संकलीत करायला वेळ लागतो आहे. दरम्यान विलंब कमी करण्यासाठी त्या कामाला गती देणे सुरु आहे. त्याचवेळी आंदोलनकर्त्यांची मनधरणी सुरु असून आंदोलन मागे घेण्यासाठीही प्रयत्न केले जात आहे. – संतोष काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती
Source link
आयुक्तालयासह महसूलमध्ये पदोन्नती घोटाळा:न्यायालयाने फटकारल्यानंतरही सुधारणा नाही, निवृत्त कर्मचाऱ्यांचे 15 ला आंदोलन