महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक आणि उद्योग आणल्याचे दावे सरकारकडून केले जात असतानाच राज्यातील बंद पडलेल्या कंपन्यांचा मुद्दा पुढे आला आहे. मुंबईत तब्बल 12 हजार 9 कंपन्या, तर पुण्यात 6 हजार 433 कंपन्या बंद झाल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळास
.
पत्रकार परिषदेत राजाभाऊ वाजे यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक परिस्थितीवर भाष्य केले. सरकारकडून विविध ठिकाणी हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार (एमओयू) झाल्याचे दावे केले जात आहेत. नवीन गुंतवणूक राज्यात यावी यासाठी सरकारने प्रयत्न करणे चुकीचे नाही, मात्र त्याचवेळी राज्यातील विद्यमान उद्योगांची स्थिती काय आहे, याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे वाजे म्हणाले.
मुंबई, पुणे, नाशिकमध्ये कंपन्या बंद होण्याचा मुद्दा
राजाभाऊ वाजे म्हणाले की, मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या भागांमध्ये उद्योगांसाठी पाणी, वीज, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. असे असतानाही या भागांमध्ये कंपन्या बंद पडत आहेत. कंपन्या बंद होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात; मात्र एखादी कंपनी बंद पडल्यानंतर तिची जागा दीर्घकाळ तशीच पडून राहते, असे त्यांनी सांगितले.
“कंपनी बंद पडल्यानंतर तो प्लॉट तसाच राहतो. नवीन उद्योग आणण्यासाठी जमीन उपलब्ध नाही, असे शासन सांगते. मात्र बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागा उपलब्ध करून दिल्या तर नवीन उद्योगांना त्या ठिकाणी संधी देता येऊ शकते,” असा मुद्दा त्यांनी मांडला.
कंपन्यांचे काही करार, कर्ज किंवा इतर कायदेशीर बाबी प्रलंबित असल्याने बंद पडलेल्या उद्योगांच्या जागा तातडीने नव्या उद्योगांना उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या प्रकरणांचे जलदगतीने निराकरण करून बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागा नव्या उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे वाजे यांनी सांगितले.
‘नवीन उद्योगांसाठी जमीन नाही, मग बंद कंपन्यांच्या जागा का नाही?’
पुणे, मुंबई आणि नाशिक या औद्योगिक पट्ट्यांमध्ये नवीन उद्योगांना येण्याची इच्छा आहे; मात्र जागेची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागांचा वापर नव्या उद्योगांसाठी करण्यावर सरकारने भर द्यावा, अशी भूमिका राजाभाऊ वाजे यांनी मांडली.
नवीन गुंतवणुकीसाठी केवळ सामंजस्य करार करण्यापेक्षा राज्यात आधीपासून असलेल्या उद्योगांचे अस्तित्व टिकवणे आणि बंद पडलेल्या उद्योगांच्या जागांचा पुनर्वापर करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सूचित केले.
नाशिकच्या रस्त्यांच्या प्रश्नावरही वाजेंची टीका
पत्रकार परिषदेत नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरही राजाभाऊ वाजे यांनी भाष्य केले. नाशिकमधील रस्त्यांची अवस्था गंभीर असल्याचे सांगत त्यांनी काही महिन्यांपूर्वीच महापालिकेला पत्र दिल्याचे नमूद केले.
“नाशिकचे रस्ते नांगरलेल्या जमिनीसारखे झाले आहेत,” अशी टीका आपण यापूर्वीच केली होती, असे वाजे म्हणाले. त्यावेळी आपल्यावर टीका झाली; मात्र आता सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यांचा त्रास जाणवू लागल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकमधील रस्त्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र आणि ई-मेल केल्याचे वाजे यांनी सांगितले. रस्त्यांची कामे करताना केवळ तात्पुरती डागडुजी न करता नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून १७ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरेंनीही उपस्थित केला उद्योगांचा मुद्दा
याच विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही सोशल मीडियावरून सरकारवर निशाणा साधला होता. महाराष्ट्रात ३६ हजार २११ खासगी कंपन्यांनी कामकाज बंद केले किंवा राज्यातून आपले कामकाज हलवले, असा दावा त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी उद्योगांसाठी केवळ नवीन कंपन्या आणण्यावर भर न देता राज्यात आधीपासून कार्यरत असलेल्या कंपन्यांसाठी नियमांचे सुलभीकरण, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था निर्माण करण्याची गरज व्यक्त केली.
चाकण, हिंजवडी, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक एमआयडीसीसारख्या प्रमुख औद्योगिक पट्ट्यांमध्ये नागरी सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या समस्या असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या काही वर्षांतील राजकीय अस्थिरता आणि स्थानिक पातळीवरील राजकारणाचाही उद्योगांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले.
रोजगारनिर्मिती हा सरकारचा सर्वात महत्त्वाचा अजेंडा असायला हवा, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी चांगले शिक्षण, भ्रष्टाचारमुक्त पायाभूत सुविधा आणि विद्यमान कंपन्यांसाठी व्यवसाय सुलभता यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली.
हेही वाचा…
संजय राऊत म्हणजे फेकूचंद:स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनीच कट रचला होता; नरेश म्हस्केंचा आरोप

शिवसेनेचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “संजय राऊत हे ‘फेकूचंद’ असून, राज्यसभेचे तिकीट उशिरा दिल्याने त्यांनीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना शिव्या घातल्या होत्या,” असा दावा म्हस्के यांनी केला आहे. राऊतांच्या आरोपांना उत्तर देताना म्हस्केंनी थेट राजीनाम्याचे आव्हानही दिले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी