![]()
महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेची नांदेड परिमंडलातही प्रभावी अंमलबजावणी सुरू असून जुलै 2026 पर्यंत नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत 65731 सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. वाहिनी विरहीत या योजनेमुळे केवळ दिवसाच्या कालावधीतच शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झालेली आहे. मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेआधी राज्यात महावितरणतर्फे ‘कुसुम-ब’ या नावाने वाहीनीविरहित सौर कृषीपंप योजना राबविण्यात आली. त्या जुन्या योजनेतील सौर कृषीपंप वगळून ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत नांदेड जिल्ह्यात 10803, परभणी जिल्ह्यात 32696 तर हिंगोली जिल्ह्यात 22232 सौर कृषीपंप शेतकऱ्यांच्या शेतात बसविण्यात आले आहेत. मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेचे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून 30 टक्के तर राज्य सरकारकडून 60 टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषीपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. या योजनेमुळे कृषिपंपासाठी पैसे भरून वीज जोडणीची प्रतिक्षा असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ‘पेड पेंडिंग’ चा प्रश्न सुटणार आहे. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची व्यवस्था केलेली आहे. शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याने त्याचा हिस्सा भरायचा असतो. शेतकऱ्याकडून पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड केली जाते. पंप बसविण्याच्या ठिकाणाची महावितरण, एजन्सी व शेतकरी अशी तिघांकडून संयुक्त पाहणी केली जाते, त्यानंतर कार्यादेश एजन्सीला दिला जातो आणि शेतात पंप बसविला जातो. पंप बसविणाऱ्या एजन्सीवर पुढच्या काळात देखभाल दुरूस्तीचीही जबाबदारी आहे. सौर पॅनलमधुन 25 वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषीपंपाचे वीजबिल येत नाही. हे पंप पारंपारिक वीजपुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होते. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
Source link
नांदेड परिमंडळात 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेचा धमाका:65,731 शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप कार्यरत