Headlines

आजच्या काळातही ग्रंथसंवर्धनाची गरज:विश्वास पाटील यांचे प्रतिपादन; शि. द. फडणीस, यास्मिन शेख यांचा गौरव




पुणे येथे आयोजित पहिल्या नांदी संमेलनात ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी ‘आजच्या काळातही ग्रंथसंवर्धनाची गरज’ असल्याचे प्रतिपादन केले. पुणे ही नवकल्पनांची जननी असून, मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात अखिल भारतीय राष्ट्रीय सभेच्या निर्मितीपूर्वीच झाली, हा एक सुवर्णयोग असल्याचेही ते म्हणाले. न्यायमूर्ती रानडे यांच्या संकल्पनेतून साहित्य सभेची स्थापना झाली, ज्याची ध्येये ग्रंथलेखन, ग्रंथसंवर्धन आणि प्रसार ही होती. जुन्या ग्रंथांच्या सुगंधातून आणि संशोधनातून मिळणारे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण ज्या परिसरात राहतो, तेथील इतिहास आणि संस्कृतीचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्यनिर्मिती होणे गरजेचे आहे, असे पाटील यांनी नमूद केले. जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि देश-विदेशात ९९ नांदी संमेलने आयोजित केली जाणार आहेत. यापैकी पहिले नांदी संमेलन शुक्रवारी (दि. १४) महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाऊंडेशन आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेतर्फे टिळक रस्त्यावरील हिराबाग येथे पार पडले. यावेळी विश्वास पाटील अध्यक्षपदावरून बोलत होते. या संमेलनाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, शंभराव्या संमेलनाचे संयोजक राजेश पांडे, पहिल्या नांदी संमेलनाचे संयोजक डॉ. सागर देशपांडे, मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते. तसेच, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भारत सासणे, डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख आणि विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. वयाची शंभर वर्षे पूर्ण केलेले हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांचा विशेष सन्मान मूर्तीशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. मराठी भाषा व्याकरण क्षेत्रात योगदान दिलेल्या यास्मिन शेख यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. पाटील पुढे म्हणाले की, साहित्यिक समाजधुरीणांनी सर्वसामान्य वर्गाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज देशातील भांडवलदार आणि राजकीय नेते आपल्या मुलाबाळांमध्ये इतके दंग आहेत की, त्यांना सर्वसामान्यांच्या मुलांचे भान राहिलेले नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्य मुले रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. इतिहासाचे परिशीलन करताना आपल्याकडे आणि परदेशात काय घडले, याचा संशोधनात्मक इतिहास लिहिणे आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *