![]()
आपल्या वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे कायम चर्चेत राहणारे हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची नुकतीच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चांगलीच खडाजंगी झाली. आरोग्य विभागातील बदल्यांच्या मुद्द्यावरून संतापलेल्या आमदार बांगर यांनी अधिकाऱ्यावर थेट शब्दांत हल्लाबोल करत, “तुम्ही नोकर आहात, त्यामुळे नोकरांसारखेच वागा,” अशा शब्दांत त्यांना भर बैठकीत सुनावले. या आक्रमक पवित्र्यामुळे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. आपल्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या आमदार संतोष बांगर यांनी काही महिन्यांपूर्वी नांदेड येथे पार पडलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या आढावा बैठकीत थेट महायुती सरकारलाच घरचा आहेर दिला होता. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांसारख्या वरिष्ठ नेत्यांसमोर आक्रमक पवित्रा घेत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद थेट शब्दांत मांडून तक्रारींचा पाढा वाचला. त्यांच्या या भूमिकेमुळे बैठकीतील वातावरण काही काळ तापले आणि गंभीर झाले होते. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला. ‘सत्तेमुळे काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली असून, अशा मंत्र्यांना आधी घरी बसवा,’ अशा खरमरीत शब्दांत बांगर यांनी स्वतःच्याच सरकारमधील नेत्यांना धारेवर धरले होते. ‘ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असून आता ऑपरेशन टायगर 2 देखील होणार,’ असे सूचक वक्तव्य जून महिन्यात करून आमदार संतोष बांगर यांनी राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आणले होते. बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याप्रमाणेच संतोष बांगर हेही नेहमीच त्यांच्या विविध विधानांमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांचे नाव वेगवेगळ्या वादांशी जोडले जात असले, तरी संतोष बांगर यांची त्यांच्या मतदारसंघातील लोकप्रियता आणि जनतेशी असलेली नाळ आजही कायम असल्याचे दिसून येते.
Source link
"तुम्ही नोकर आहात, नोकरांसारखे वागा":आमदार संतोष बांगर जिल्हा परिषदेच्या बैठकीत भडकले, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सुनावले