Headlines

शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी संतप्त:हिंगोलीत बैठकीतच जोरदार घोषणाबाजी, पालकमंत्री बैठकीतून तडकाफडकी बाहेर




हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी ता. १५ आरोग्य विभागाच्या बैठकीत येऊन शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी गदारोळ वाढल्याने पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी बैठकीतून पोलिस बंदोबस्तात काढता पाय घेण्याची वेळ आली. त्यानंतर झिरवाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन बसले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री झिरवाळ यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाची बैठक झाली. यावेळी खासदार रामराव वडकुते, खासकार नागेश पाटील आष्टीकर, आमदार प्रज्ञा सातव, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हयात आरोग्य विभागाने केलेल्या उत्कृष्ठ कामाची माहिती दिली जात होती. मात्र लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्‍नांवर जिल्हाधिकारी गुप्ता हेच उत्तर देऊ लागले होते. त्यामुळे आमदार बांगर यांनी जिल्हाधिकारी गुप्ता यांना शांत करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्याची सूचना केली. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांना माहिती देता आली नाही. यावरून लोकप्रतिनिधी चांगलेच संतप्त झाले. आरोग्य विभागाच्या कारभारावरून गदारोळ सुरु झाला. दरम्यान याचवेळी काही शेतकऱ्यांनी बैठकीत प्रवेश केला. शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देणार नाही असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात पालकमंत्री झिरवाळ यांनी भुमीका मांडण्याची मागणी करण्यात आली. यापुर्वीच्या बैठकीत पालकमंत्री झिरवाळ यांनी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर या संदर्भात बैठक घेण्याचे ता. १ मे रोजी जाहिर केले होते. मात्र बैठक झालीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिव्र संताप व्यक्त केला. यावेळी मोठा गदारोळ सुुरू असताना शेतकरी चांगलेच संतप्त झाले. त्यांचा संताप पाहून पोलिसांनी तातडीने पालकमंत्री झिरवाळ यांच्या समोर संरक्षण कडे केले. मात्र त्यानंतरही शेतकरी ऐकत नसल्याने पालकमंत्र्यांनी पोलिस बंदोबस्तात बैठकीतून निघून जात जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या कक्षात जाऊन बसले. त्यानंतरही शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात जात असताना पोलिसांनी त्यांना रोखून बाहेर काढले त्यानंतर वातावरण शांत झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *