Headlines

शैक्षणिक उपक्रम:ग्रंथालय विद्यार्थ्यांचा ज्ञानविकास आणि व्यक्तिमत्व घडवणारे केंद्र : डॉ. सागडे




ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे भांडार नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञानविकासाचे आणि व्यक्तिमत्त्व घडविण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील उपलब्ध ज्ञानसंपदेचा अधिकाधिक उपयोग करून आपल्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा द्यावी, असे आवाहन न्यु आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले. न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. सागडे यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रंथालयशास्त्राच्या क्षेत्रात डॉ. रंगनाथन यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचे स्मरण करून त्यांच्या ज्ञानविषयक योगदानाला अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच ग्रंथालयातील विविध संदर्भग्रंथ, पुस्तके आणि अन्य ज्ञानस्रोतांचा प्रभावी वापर व्हावा या उद्देशाने कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. गेल्या वर्षभरात महाविद्यालयीन ग्रंथालयातील ज्ञानसंपदेचा सर्वाधिक प्रभावी वापर करणाऱ्या गीता तोडमल हिला ‘बेस्ट युझर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. तसेच ग्रंथालयशास्त्र विषयातील नेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल आकाश सांगळे याचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणात ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित करताना उपस्थितांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचन, संदर्भग्रंथांचा अभ्यास आणि विविध ज्ञानस्रोतांचा उपयोग करावा, असे मत व्यक्त केले. डिजिटल युगात माहितीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी प्रमाणित आणि दर्जेदार ज्ञानासाठी ग्रंथालयाचे महत्त्व कायम असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल प्रा. संगिता निमसे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, बबन साबळे, महाविद्यालयातील प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी एस. एस. डांगे, चेतन साळवे, बनसोड, मते, म्हस्के यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डिजीटल युगातही ग्रंथालयांचे महत्व अबाधित आजच्या डिजिटल युगात माहिती मिळवण्याचे अनेक पर्याय सहज उपलब्ध असले, तरीही प्रमाणित, अधिकृत आणि दर्जेदार ज्ञानासाठी ग्रंथालयाचे महत्त्व आजही अबाधित आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचन, विविध संदर्भग्रंथांचा अभ्यास आणि संशोधनपर वृत्ती जोपासावी, असे आवाहन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *