Headlines

आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा स्कूलची घोडदौड कायम:आठरे पाटील स्कूलने पेनल्टी शूटआऊटमध्ये आर्मी पब्लिक स्कूलचा केला पराभव‎




फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या गुरुवारी झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य आणि बचावात्मक खेळाचे दर्शन घडविले. मुलींच्या १६ वर्षांखालील गटाची उपांत्य फेरी तसेच मुलांच्या १२, १४ आणि १६ वर्षांखालील गटातील उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगले. काही सामने एकतर्फी झाले तर आठरे पाटील पब्लिक स्कूल आणि आर्मी पब्लिक स्कूल यांच्यातील १४ वर्षांखालील सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगला. दरम्यान, प्रवरा पब्लिक स्कूलने मुलांच्या विविध वयोगटांत दमदार विजय मिळवत आपली आगेकूच कायम ठेवली. मुलींच्या १६ वर्षांखालील गटात प्रवरा पब्लिक स्कूलने श्री साई स्कूलचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात आठरे पाटील पब्लिक स्कूल आणि आर्मी पब्लिक स्कूल यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. मात्र, निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला. यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लावण्यात आला. आठरे पाटील पब्लिक स्कूलकडून वेदांत, खेसे आणि अलख यांनी प्रत्येकी १ गोल केला. आर्मी पब्लिक स्कूलकडून राजवीर याने १ गोल केला. अखेर आठरे पाटील पब्लिक स्कूलने पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ गोलने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात आठरे पाटील पब्लिक स्कूलने आर्मी पब्लिक स्कूलवर ३-० गोलने मात केली. आठरे पाटील स्कूलकडून ओम लोखंडे याने ३१ व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर त्यानेच ३८ व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाची आघाडी भक्कम केली. ५८ व्या मिनिटाला धैर्य कळमकर याने गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेर आठरे पाटील पब्लिक स्कूलने ३-० गोलने दणदणीत विजय मिळवला. मुलींच्या गटात प्रवरा स्कूल अंतिम फेरीत मुलींच्या १६ वर्षांखालील गटातील उपांत्य फेरीचा सामना प्रवरा पब्लिक स्कूल आणि श्री साई स्कूल यांच्यात रोमहर्षक झाला. प्रवरा पब्लिक स्कूलने ३-० गोलने विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. आता मुलींच्या गटातील अंतिम सामना आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध प्रवरा पब्लिक स्कूल असा रंगणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये प्रवरा पब्लिक स्कूलने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *