![]()
धीरज परदेशी खून प्रकरणी स्थानिक पोलिस प्रशासनाची भूमिका अत्यंत संशयास्पद असून, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे नोंदवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली. मुख्य आरोपींना अटक न करता केवळ मदतनीसांना पकडून पोलिस या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा व मुख्य आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी हे आरोप फेटाळून लावत अशी वस्तुस्थिती नसल्याचे सांगितले. आम्ही जे काम केले ते सर्वांना माहिती आहे, असे ते म्हणाले. आमदार जगताप यांनी आरोपींच्या अनधिकृत घरांवरील स्थगिती उठवून ती पाडण्याची कारवाई करावी, आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तम सरकारी वकिलाची नियुक्ती करावी आणि परदेशी यांच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी, या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले. अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपअधीक्षक दिलीप टिपरसे हे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप केला. स्थानिक पोलिसांवर विश्वास राहिला नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासासाठी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. परदेशी खून प्रकरणाचा घटनाक्रम • ७ ऑगस्ट : धीरज परदेशी यांच्यावर हल्ला • ७ ऑगस्ट : हल्ला प्रकरणी मनपाचा वायरमन युनूस शेखला अटक • ९ ऑगस्ट : धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू • ९ ऑगस्ट : मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद, सिराज इब्राहिम सय्यद यांना हैदराबादमधून अटक • ९ ऑगस्ट : आरोपींना मदत करणारे ख्वाजामियॉ उर्फ अकरम याकुब सय्यद, वसीम रहिम सय्यद यांना अटक • ९ ऑगस्ट : पाचही आरोपींना १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी • १० ऑगस्ट : हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे पोलिस अधीक्षक चौकात आंदोलन • १० ऑगस्ट : मयत धीरज परदेशीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार • १३ ऑगस्ट : आरोपींना मदत करणाऱ्या इम्रान मुसा सय्यद याला अटक • १४ ऑगस्ट : आमदार संग्राम जगताप यांचे पोलिसांच्या तपासावर आरोप तपास प्राथमिक टप्प्यात, आरोपी वाढू शकतात ^परदेशी खून प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. आरोपी आमच्या कोठडीत आहेत. त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे. तपास करून चार्जशीट दाखल करायला ९० दिवस लागतील. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढू शकते. जे गुन्ह्यात सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांवर जे आरोप झाले आहेत, ते योग्य नाहीत. – मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्ष सोशल मीडियातून खोटे आरोप, धीरजचे कोणाशीही भांडण नव्हते ^ माझ्या पतीच्या निधनानंतर सोशल मीडिया माध्यमातून मोठ्या प्रमाणात खोटे आरोप केले जात आहेत. माझ्या पतीची याप्रकरणी काहीही चूक नाहीये. ते मूळचेच धार्मिक व हिंदू विचाराचे होते. ते रोजच अभिमानाने भगवा टिळा लावत असे. घटना घडली त्यादिवशी दुपारी एक वाजता माझे व पतीचे फोन द्वारे शेवटचे संभाषण झाले. धीरज यांचा व आरोपींचा काही एक संबंध नाही. तसेच त्यांचे कोणाशीही भांडण नव्हते. पोलिस चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण घेत आहेत. – पल्लवी परदेशी, स्व.धीरज यांची पत्नी
Source link
आरोप-प्रत्यारोप:पोलिसांकडून प्रकरणाला वेगळे वळण- आ. जगताप; आम्ही जे काम केले ते सर्वांना माहिती- एसपी सुदर्शन