![]()
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपूर येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर आयोजित ‘नागपूर थॉट्स’ या विशेष कार्यक्रमात तरुण पिढीला मार्गदर्शन केले. लोकशाहीमध्ये मतभेद आणि आंदोलने स्वाभाविक असली तरी नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या भाषणात डॉ. भागवत यांनी लोकशाही व्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्यांवर विशेष भर दिला. ते म्हणाले की, लोकशाहीत विविध विचार, मतभेद किंवा विरोध असणे नैसर्गिक आहे. संवाद साधणे, आपली बाजू मांडणे आणि इतरांच्या मतांचा आदर करणे हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. जनहितार्थ प्रश्न उपस्थित करताना तीव्रतेने आणि स्पष्टपणे भूमिका मांडणे आवश्यक आहे. आंदोलने आणि निदर्शने हा लोकशाहीचाच भाग असल्याचे सांगताना त्यांनी संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील ऐतिहासिक भाषणाचा दाखला दिला. डॉ. आंबेडकरांनी लोकशाहीतील हक्क आणि जबाबदाऱ्यांचा समतोल स्पष्ट केला होता. निदर्शने किंवा आंदोलने करताना नागरिकांनी नेहमी आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे, असे डॉ. भागवत यांनी नमूद केले. त्यांनी ‘जेन झी’ला उद्देशून हे विचार मांडले. कार्यक्रमातील तरुणांच्या लक्षणीय उपस्थितीचा उल्लेख करत डॉ. भागवत यांनी भारताच्या ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’वर (तरुण लोकसंख्येचा लाभांश) भाष्य केले. तरुण पिढीला योग्य दिशा, शिक्षण आणि संस्कार मिळाल्यास ती राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती ठरू शकते, मात्र दुर्लक्ष झाल्यास ती समाजासाठी मोठी अडचण ठरू शकते, असे ते म्हणाले. त्यामुळे राष्ट्रउभारणीत तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
Source link
लोकशाहीत मतभेद स्वाभाविक, पण जबाबदारीचे भान हवे:सरसंघचालक मोहन भागवतांचा तरुणांना संदेश