Headlines

स्वातंत्र्य दिन विशेष‎:शहिदाच्या पत्नीने मोडल्या रूढींच्या बेड्या;‎वीरपत्नींच्या सन्मानासाठी उभारली चळवळ‎




पती देशासाठी शहीद झाल्यानंतर पत्नीची ओळख वीर पत्नी म्हणूनच केली जाते. परंतू, रुढी परंपरांच्या जोखडाखाली, त्या स्त्रीला पारंपरिक सण-उत्सवांमध्ये दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो. मात्र, पतीच्या बलिदानानंतरही तिचा सन्मान, आत्मविश्वास आणि सामाजिक स्थान कायम राहावे, आणि शहीद पती अमर आहेत, या विचारातून वीरपत्नी अंबिका भोंदे यांनी रूढींना छेद देणारी चळवळ उभी केली आहे. संक्रांत आणि वटसावित्रीसारख्या पारंपरिक सणांच्या पूजेत वीर पत्नी तसेच माजी सैनिकांच्या विधवा महिलांना सहभागी करून घेत त्यांनी सन्मानाची नवी परंपरा सुरू केली आहे. अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील अंबिका भोंदे यांचे पती नारायण रघुनाथ भोंदे हे लेह-लडाख परिसरातील ५०३ एएससी बटालियनमध्ये सेवा बजावत असताना ४ एप्रिल २०१५ रोजी ते शहीद झाले. या घटनेमुळे त्यांच्यावर मोठा आघात झाला. या घटनेतून सावरत वीरपत्नीं साठी पुढे येण्याचा निर्धार केला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील वीर नारी समितीवर त्या सदस्य आहेत. तसेच वीररत्न फाउंडेशन आणि वीर जवान फाउंडेशनच्या माध्यमातूनही त्या कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यातील सर्वाधिक वेगळा पैलू म्हणजे विधवा प्रथा निर्मूलनासाठी त्यांनी सुरू केलेली सण-उत्सवांची चळवळ. पती शहीद झाल्यानंतर वीर पत्नींना सुवासिनींच्या पारंपरिक सणांपासून दूर ठेवण्याची मानसिकता त्यांनी नाकारली. संक्रांतीच्या दिवशी वीर पत्नी व माजी सैनिकांच्या विधवा महिलांना सहभागी करून घेत हळदी-कुंकू, पुजा आणि संक्रांतीचे पारंपरिक विधी घडवले. त्याचप्रमाणे वटसावित्रीच्या दिवशीही या महिलांकडून वटपूजा करून घेतली जाते. पतीच्या निधनानंतर सुवासिनींच्या पूजेत सहभागी होण्याचा अधिकार नसल्याची सामाजिक रूढी अन् विचारसरणी त्यांनी मोडून काढली. चार जिल्ह्यांसह इतर राज्यातही काम वीर पत्नी अंबिका भोंदे यांचे कार्य, अहिल्यानगरपुरते मर्यादित न राहता या उपक्रमाचा विस्तार नाशिक, पुणे, सोलापूर आणि मुंबईपर्यंत झाला आहे. सुमारे दीड ते दोन हजार महिलांना या उपक्रमाशी त्यांनी जोडले. पती देशासाठी शहीद झाला म्हणून पत्नीची सामाजिक ओळख केवळ विधवा म्हणून मर्यादित राहू नये, हा भोंदे यांच्या चळवळीचा केंद्रबिंदू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *