पुण्यातील चाकण एमआयडीसीत (Chakan MIDC) सध्या वाहतूक कोंडी, खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे उद्योजक आणि कामगार हैराण झाले आहेत. याच त्रासाला कंटाळून 20 लघुउद्योगांनी आपल्या कंपन्या इतरत्र स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे वृत्त समोर आले
.
मंत्री येणार म्हणून रात्रीत खड्डे बुजवले!
चाकण एमआयडीसीतील या गंभीर समस्येची दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज (16 ऑगस्ट) चाकणचा दौरा करत आहेत. त्यांच्या दौऱ्याची माहिती मिळताच प्रशासन आणि कंत्राटदार खडबडून जागे झाले. एरवी रस्त्यांच्या दुरवस्थेकडे डोळेझाक करणाऱ्या यंत्रणेने थेट मध्यरात्री रस्त्यांची डागडुजी सुरू केली. काही ठिकाणी खड्डे बुजवण्यात आले, तर काही ठिकाणी रात्रीच्या अंधारातच रस्त्यालगतच्या साईड पट्ट्या भरण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे ‘मंत्री येणार म्हटल्यावर दाखवली जाणारी ही तत्परता एरवी का दाखवली जात नाही?’ असा संतप्त सवाल आता नागरिक करत आहेत.
उच्चस्तरीय समिती आणि तक्रार निवारण कक्षाची कार्यकक्षा
उद्योजकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी शासनाने 14 सदस्यीय समिती गठीत केली असून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. चाकणच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि रस्ते विकासासाठी ९० दिवसांत एकात्मिक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण, पार्किंग आणि चौकांच्या विकासाची कामे ‘फास्ट-ट्रॅक’वर (Fast-track) आणली जातील. उद्योजकांच्या प्रलंबित तक्रारी आणि परवानग्यांमधील विलंबावर वेळेत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी विविध विभागांशी समन्वय साधून समितीकडून नियमित आढावा घेतला जाणार आहे.
सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “मी जर राज्याची उद्योगमंत्री असते, तर बातमी लागल्या लागल्या तिथे धावून गेले असते,” असे सुळे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “आंध्र आणि तेलंगणाचे उद्योगमंत्री उद्योजकांसाठी ‘रेड कार्पेट’ घालत आहेत, आणि आपल्याकडे उद्योग टिकवण्याकडेच दुर्लक्ष होत आहे. सरकार म्हणते उद्योग बाहेर गेले नाहीत, फक्त बंद कंपन्यांची नोंद रद्द झाली आहे. जर उद्योग गेले नसतील, तर तिथल्या रस्त्यांवर रोज दिसणारे मोठे खड्डे तरी खोटे आहेत का? प्रश्नांना बगल देणे म्हणजे लीडरशिप नाही, तर जबाबदारी घेऊन प्रश्न सोडवणे म्हणजे खरी लीडरशिप असते,” असा टोला त्यांनी लगावला. उशिरा का होईना, पण आता सरकारच्या या नव्या निर्णयामुळे आणि उच्चस्तरीय समितीच्या स्थापनेमुळे चाकण एमआयडीसीतील उद्योजकांचे आणि कामगारांचे प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा…
जयकुमार गोरे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री:पत्रकार परिषद घेताना थोडी कमी पीत चला; सुषमा अंधारेंचा जयकुमार गोरेंवर जोरदार पलटवार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यातील शाब्दिक युद्ध आता शिगेला पोहोचले आहे. जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून अत्यंत आक्रमक आणि जळजळीत भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. “जयकुमार गोरे हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत,” असा टोला लगावत अंधारे यांनी गोरेंच्या संस्कारांवर आणि भाषेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी