Headlines

युद्धामुळे नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडले!:सुजय विखे पाटील म्हणाले- युद्धामुळे डांबर मिळत नाही, दिल्लीहून आणावं लागतंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस पाहिला नाही




नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असताना भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी या रस्त्याच्या कामाला विलंब होण्यामागे आंतरराष्ट्रीय युद्धाची परिस्थिती कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी ट्रम्प यांच्यासारखा “वेडा माणूस” आपल्या आयुष्यात पाहिला नसल्याचेही म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नगर-मनमाड महामार्गाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अहिल्यानगर येथे एका कार्यक्रमात बोलताना सुजय विखे पाटील यांनी नगर-मनमाड महामार्गाच्या कामातील अडथळ्यांबाबत भाष्य केले. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे असून, या रस्त्याचा त्रास सामान्य नागरिकांप्रमाणे आपल्यालाही होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युद्धामुळे डांबर मिळत नाही, दिल्लीहून आणावं लागतंय नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला विलंब का होत आहे, याचे स्पष्टीकरण देताना सुजय विखे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा संदर्भ दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, युद्धामुळे डांबराच्या उपलब्धतेवर परिणाम झाला असून आता कंत्राटदाराला डांबर दिल्लीहून आणावे लागत आहे. वाहतूक खर्च आणि इतर कारणांमुळे रस्त्याच्या कामाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एखाद्या वस्तूची किंमत पूर्वी पाच रुपये असेल तर आता ती अडीच पट वाढली असल्याचे सांगत या वाढीव खर्चाला मंजुरी घेण्याची प्रक्रियाही करावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आज डांबर मिळत नसल्यामुळे कंत्राटदाराला दिल्लीहून गाडीने डांबर आणावं लागतंय. रस्त्याची किंमत आज पाच रुपये असेल तर ती अडीच पटीने वाढली आहे. त्या वाढीव खर्चालाही मंजुरी घ्यावी लागते. हे तांत्रिक मुद्दे आहेत,” असे विखे पाटील यांनी सांगितले. ट्रम्पसारखा वेडा माणूस पाहिला नाही यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणविरोधातील कारवाईचा संदर्भ देत विखे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. “ट्रम्पनी इराणवर मिसाइल टाकताना या कंत्राटदाराला विचारलं होतं का? मला विचारलं होतं का, मी मिसाइल टाकू का? मिसाइल टाकल्यावर त्याचा काय परिणाम होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ट्रम्प यांच्या धोरणांमध्ये सातत्य नसल्याची टीका करताना ते म्हणाले की, सकाळी एक निर्णय जाहीर केला जातो आणि संध्याकाळी पुन्हा वेगळा निर्णय घेतला जातो. त्यामुळे अशा परिस्थितीचा परिणाम जगभरातील पुरवठा आणि खर्चावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. “असा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही,” असे विखे पाटील यांनी ट्रम्प यांच्याबद्दल म्हटले. तुम्हाला जो त्रास होतोय, तो मलाही होतोय नगर-मनमाड महामार्गाच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची आपल्यालाही जाणीव असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. आपल्या मुलीच्या शिक्षणाच्या कारणामुळे पत्नी आणि मुले अहिल्यानगरला राहत असून आपण लोणी येथे राहत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करण्याचा त्रास आपल्यालाही सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “रस्ता किती गरजेचा आहे हे मला माहीत आहे. तुम्हाला जो त्रास होतोय, तो मलाही होतोय. मला रोज नगरला ये-जा करावी लागते,” असे विखे पाटील म्हणाले. त्यामुळे रस्ता खराब असल्याने आपल्यालाही त्रास होत असला तरी तो पूर्ण करण्याला पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. या त्रासाचं उत्तर आंदोलन नाही नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून नागरिकांनी आंदोलन करण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही सुजय विखे पाटील यांनी केले. “जनतेच्या त्रासाला आम्ही पूर्णपणे न्याय देण्याच्या भूमिकेत आहोत. पण या त्रासाचं उत्तर आंदोलन नाही, कंत्राटदाराच्या लोकांना मारहाण करणं नाही,” असे ते म्हणाले. राहुरीमध्ये कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून रात्रीच्या वेळी साइड गटाराचे काम सुरू होते. मात्र कर्मचाऱ्यांवर झालेल्या प्रकारामुळे आता कंत्राटदाराचे कर्मचारी राहुरीला जाण्यास तयार नसल्याचा दावाही विखे पाटील यांनी केला. यामुळे प्रत्यक्ष काम करणाऱ्या यंत्रणेवर परिणाम होत असून परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होत असल्याचे त्यांनी सांगितले. हा रस्ता याच कंत्राटदाराकडून झाला नाही तर पुन्हा होणार नाही नगर-मनमाड महामार्गाच्या कामासाठी सध्याच्या कंत्राटदाराची भूमिका महत्त्वाची असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. हा कंत्राटदार बदलला तर रस्त्याचे काम पुन्हा रखडण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला. “हा रस्ता या कंत्राटदाराकडून झाला नाही तर परत होणार नाही. आणि हा रस्ता कोणी पूर्ण करू शकतो तर तो फक्त सुजय विखे पाटीलच पूर्ण करू शकतो,” असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महामार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर नगर-मनमाड महामार्गाची खराब अवस्था, रखडलेले काम आणि नागरिकांना होणारा त्रास हा गेल्या काही काळापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख प्रश्न बनला आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीचा वाढलेला वेळ आणि अपघातांचा धोका यामुळे नागरिकांकडून सातत्याने नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी कामाला होणाऱ्या विलंबामागे डांबराचा पुरवठा, वाढलेला खर्च आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती यांचा संदर्भ दिला आहे. मात्र, “युद्धामुळे महामार्गाचे काम रखडले” या त्यांच्या दाव्यावरून आता विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, रस्ता पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारत विखे पाटील यांनी नागरिकांना होणारा त्रास आपल्यालाही होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता त्यांच्या वक्तव्याप्रमाणे नगर-मनमाड महामार्गाचे काम प्रत्यक्षात किती वेगाने पूर्ण होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा… रायगड हादरले:महाड MIDC मधील ‘इंडो अमायन्स’ कंपनीत वायूगळती; एका कामगाराचा मृत्यू, 8 जण जखमी रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीत (MIDC) एक दुर्दैवी दुर्घटना उघडकीस आली आहे. येथील ‘इंडो अमायन्स’ या रासायनिक कंपनीत शनिवारी संध्याकाळी अचानक विषारी वायूची गळती झाली. या दुर्घटनेत एका कामगाराला आपले प्राण गमवावे लागले असून, अन्य ८ जण गंभीररीत्या बाधित झाले आहेत. या घटनेमुळे महाड शहर आणि औद्योगिक वसाहतीत मोठी खळबळ उडाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *