Headlines

सातारा गुन्हेगारी वार्ता:शिरवळमध्ये बंद घर फोडून 2.10 लाखांचा मुद्देमाल लंपास




शिरवळ परिसरातील दत्तनगर येथे बंद घराच्या दरवाजाची कडी-कोंयडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना 12 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या दरम्यान दत्तनगर, शिरवळ, ता. खंडाळा येथील बंद घरात घडली. याप्रकरणी शीतल विनोद काटकर (वय 25, रा. दत्तनगर, सांगवी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्याने घराचा बंद दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर सुमारे 75 हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 50 हजार रुपये किमतीचा एक तोळा वजनाचा सोन्याचा नेकलेस, 50 हजार रुपये किमतीची एक तोळा वजनाची सोन्याची चैन, 15 हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुले आणि 20 हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, घराशेजारी राहणाऱ्या गणेश अडागळे यांच्या घरातही अशाच प्रकारे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार धायगुडे करीत आहेत. मतिमंद मुलीचा गैरफायदा घेत अत्याचार; मेढा पोलिसांत गुन्हा दाखल जावली तालुक्यातील एका गावात मतिमंद तरुणीचा गैरफायदा घेत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावली तालुक्यातील एका घरात संबंधित तरुणी एकटी असताना तिच्या फिर्यादी यांचा चुलत पुतण्याने घरात प्रवेश केला. पीडित तरुणीला मतिमंदत्व असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिचा गैरफायदा घेत तिच्यावर तीन वेळा जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच, याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना जुलै 2026 मध्ये घडल्याचे फिर्यादीत नमूद असून, घटनेची नेमकी तारीख व वेळ माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यानही संबंधित प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी पीडितेच्या 63 वर्षीय वडिलांनी मेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून चुलत पुतण्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत. वाढे येथे भरधाव कारची एक वर्षाच्या चिमुरड्याला धडक; दुर्दैवी मृत्यू वाढे (ता. जि. सातारा) येथे भरधाव वेगाने आलेल्या कारने एक वर्ष तीन महिन्यांच्या चिमुरड्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 10 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढे गावच्या हद्दीत मोहन हणमंत जाधव यांच्या घरासमोरील अंतर्गत रस्त्यावर टाटा कंपनीची हॅरिअर कार (क्र. एमएच 11 डीझेड 2901) चालकाने भरधाव व निष्काळजीपणे चालविली. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून धोकादायक पद्धतीने वाहन चालवित असताना कारने शिवार्थ मनोज नलावडे (वय 1 वर्ष 3 महिने, रा. वाढे, ता. जि. सातारा) याला जोरदार धडक दिली. या अपघातात शिवार्थ रस्त्यावर पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस हवालदार रामचंद्र गणपत गोरे यांनी रोहित सतीश नलावडे (वय २७, रा. वाढे, ता. जि. सातारा) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. चाळकेवाडीतील महाऊर्जा साईटवरून 20 हजारांची कॉपर केबल चोरीला चाळकेवाडी (ता. जि. सातारा) येथील महाऊर्जा साईटवरून अज्ञात चोरट्याने सुमारे २० हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना ९ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळकेवाडी येथील महाऊर्जा साईटवरील पवनचक्कीच्या खालील बाजूस असलेल्या कंट्रोल रूमजवळ कॉपर केबल ठेवण्यात आली होती. अज्ञात चोरट्याने संबंधितांच्या संमतीशिवाय ही केबल लबाडीने चोरून नेली. या चोरीची किंमत सुमारे 20 हजार रुपये आहे. याप्रकरणी महाऊर्जा संस्था, चाळकेवाडी साईट येथील राजेंद्र नामदेव पवार (रा. रांगोळी कॉलनी, शाहूपुरी, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार कर्णे करीत आहेत. वाई एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेत 60 हजारांचे मंगळसूत्र लंपास वाई एसटी स्टँडवर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली. ही घटना 12 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया नागनाथ भोसले (वय 52, रा. शांतीनगर, ता. वाई, जि. सातारा) या घरगुती सामानाची खरेदी करून वाई-वाठार बसने घरी जाण्यासाठी वाई एसटी स्टँडवर आल्या होत्या. बसमध्ये सीटवर बसल्यानंतर त्यांनी गळ्याला हात लावून पाहिले असता त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र गायब असल्याचे निदर्शनास आले. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून सुमारे 10 ग्रॅम वजनाचे, 80 सोन्याचे बारीक मणी, दोन मोठे मणी व एक डोरले असलेले सोन्याचे मंगळसूत्र, अंदाजे 60 हजार रुपये किमतीचे, चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.याप्रकरणी छाया भोसले यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार वाघमारे करीत आहेत. एलबीएस कॉलेजसमोर वाहन मागे घेण्यावरून तरुणाला मारहाण वाहतूक कोंडीमध्ये वाहन मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाला शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याची घटना साताऱ्यातील एलबीएस कॉलेजसमोर घडली. ही घटना 12 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व सचिन शिंदे (वय 20, रा. शनिवार पेठ, सातारा) आणि संशयित आरोपी हे आपापल्या दुचाकीवरून जात होते. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने आरोपीने अथर्व शिंदे यांना ‘तुझी गाडी मागे घे’ असे सांगितले. मात्र, वाहतूक कोंडीमुळे शिंदे यांना दुचाकी मागे घेता आली नाही. याचा राग आल्याने आरोपीने शिंदे यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अथर्व शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात सॅम बागवान (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पीरवाडी, ता. जि. सातारा) याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोसावी करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *