![]()
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे रविवारी ता. 16 दिवसभरात सुमारे 60 हजार पेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. सुट्टीमुळे भाविक वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. तर भाविकांना लवकर दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी अभिषेक पुजा बंद करण्यात आली तसेच स्पेशल पासही थांबविण्यात आले होते. देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होते. दरवर्षी सोमवारी सुमारे 1 लाखापेक्षा अधिक भाविक येतात. भाविकांच्या गर्दीमुळे दर्शनासाठी सुमारे साडेतीन ते चार तास लागतात. त्यामुळे यावर्षी भाविकांच्या सोयीसाठी संस्थानने मंदिराच्या गाभाऱ्याच्या पायरीजवळच मुकुट स्थापन करून दर्शनाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. तर शनिवार, रविवार व सोमवारी अभिषेक पुजा बंद करण्याचेही ठरविण्यात आले. दरम्यान, आज रविवारी सुट्टी असल्यामुळे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी आले होते. सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन ठरल्या प्रमाणे अभिषेक पुजा बंद करण्यात आली तर स्पेशल पासेसही बंद करण्यात आल्या होत्या. मंदिराच्या पश्चिमद्वारापासून भाविकांना दर्शनासाठी आत सोडण्यात आले होते. भाविकांची वाढती गर्दी असली तरी सुमारे दोन तासाच्या आतच भाविकांचे दर्शन होऊ लागले होते. त्यामुळे भाविकांना चांगलास दिलासा मिळाला. औंढा नागनाथ मंदिराचा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. सायंकाळी उशीरापर्यंत भाविकांची गर्दी झाली होती. सायंकाळपर्यंत सुमारे 60 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचा दावा संस्थानच्या वतीने करण्यात आला आहे. तर पोलिस प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Source link
औंढा नागनाथ येथे रविवारी 60 हजारपेक्षा अधिक भाविकांची गर्दी:सुट्टीमुळे गर्दी वाढल्याचा दावा, अभिषेक पूजा बंद; स्पेशल पासही थांबवली