Headlines

Navnath Ban Slams Sanjay Raut Over Devendra Fadnavis Delhi Visit Rumors


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “तुमची कितीही इच्छा असली तरी कावळ्याच्या शापाने गाय मर

.

फडणवीसांना दिल्लीला पाठवण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार नाही

“संजय राऊत पुन्हा एकदा खोटी भविष्यवाणी करत आहेत. ते देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, फडणवीस यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रातच राहतील,” असे नवनाथ बन म्हणाले. फडणवीस यांनी यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा दाखला देत बन यांनी त्यांच्या नेतृत्वाचे समर्थन केले. २०१४ ते २०१९ या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीत पुढे नेले आणि त्यानंतर २०२४ मध्ये जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला, असा दावा त्यांनी केला.

“२०१९ मध्ये पाठीत खंजीर खुपसल्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. मात्र २०२४ मध्ये जनतेने पुन्हा त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जनतेने केवळ १५ जागा दिल्या. त्यामुळे आधी आपल्या पक्षाची आणि नेतृत्वाची काय अवस्था झाली आहे, त्याचा विचार करा आणि मग फडणवीसांवर बोला,” असा टोला बन यांनी राऊतांना लगावला.

25 वर्षे सरकार राहणार म्हणालात, 25 महिनेही टिकवता आलं नाही

संजय राऊत यांच्या यापूर्वीच्या राजकीय भाकितांचा संदर्भ देत नवनाथ बन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. “तुमच्याकडे असलेली माहिती नेहमी अपुरी असते. तुम्ही २५ वर्षे महाविकास आघाडीचे सरकार राहील, असे म्हटले होते. मात्र २५ महिनेही तुम्हाला सरकार टिकवता आले नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत भविष्यवाणी करण्यापूर्वी आपल्या पक्षाची परिस्थिती पाहा,” असे ते म्हणाले. “महाराष्ट्राची पुकार देवाभाऊंसाठी आहे आणि देशाची पुकार नरेंद्र मोदींसाठी आहे,” असेही बन यांनी सांगितले.

बारामतीत मोदी-पवार भेटीवर भाजपची भूमिका स्पष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीमध्ये येणार असल्याच्या चर्चेवरही नवनाथ बन यांनी भाष्य केले. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, तर शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे दोन्ही नेते बारामतीमध्ये एकत्र येत असतील, तर त्यात गैर काहीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेचा उल्लेख केला. महिलांना आरक्षण मिळाले पाहिजे, ही पवार यांचीही भूमिका असल्याचे बन म्हणाले. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची भूमिका पवार घेतात, असे त्यांनी नमूद केले.

भाजप-शिंदे गटात कोणतेही मतभेद नाहीत

शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चांनाही नवनाथ बन यांनी फेटाळून लावले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची अनुपस्थिती असल्याच्या चर्चेवर ते म्हणाले की, त्या कार्यक्रमाचे स्वरूप आणि कोणाला निमंत्रण देण्यात आले होते, हे आधी पाहिले पाहिजे. तो परिवहन विभागाचा कार्यक्रम होता की प्रताप सरनाईक यांचा कार्यक्रम होता, हेही पाहायला हवे. एखाद्या कार्यक्रमात एखादा नेता उपस्थित राहिला नाही म्हणून लगेच भाजप आणि शिवसेनेत मनभेद निर्माण झाले, असे होत नाही. आम्ही एकदिलाने काम करत आहोत,” असे बन यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी संजय राऊतांनाच प्रत्युत्तर देताना, “शिंदे गट आणि भाजपमधील दरी शोधण्यापेक्षा जनता आणि उद्धव ठाकरे गटामध्ये किती दरी निर्माण झाली आहे, ते पाहा,” असा टोला लगावला.

वडेट्टीवारांनाही नवनाथ बन यांचे आव्हान

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर देताना नवनाथ बन यांनी चंद्रपूरमधील काँग्रेसच्या अंतर्गत परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. “चंद्रपुरातील 15 नगरसेवक तुम्हाला सांभाळता येत नाहीत. तुमच्याच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी तुम्हाला ब्लॉक केले आहे. आधी आपल्या पक्षातील परिस्थिती सांभाळा आणि मग राज्यातील इतर प्रश्नांवर भाष्य करा,” असे आव्हान त्यांनी वडेट्टीवारांना दिले.

काँग्रेस नेतृत्वावर टीका करताना बन यांनी राहुल गांधी यांच्यावरही आरोप केले. संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर देत असताना राहुल गांधी सभागृहातून निघून गेल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.

रोहित पवारांवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावरही नवनाथ बन यांनी जोरदार टीका केली. रोहित पवार महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. “सुरुवातीला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. मात्र विद्यार्थ्यांना सरकार पारदर्शकपणे परीक्षा घेत आहे, निकाल जाहीर होत आहेत आणि भरतीची प्रक्रिया सुरू आहे, हे लक्षात आले. त्यामुळे ते आंदोलनाला बळी पडले नाहीत,” असे बन म्हणाले.

सध्या सुरू असलेल्या इतर परीक्षांच्या प्रश्नांमध्ये रोहित पवार नाक खुपसून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाविकास आघाडीच्या काळात पेपरफुटी झाली

रोहित पवारांच्या भूमिकेवर टीका करताना बन यांनी महाविकास आघाडीच्या काळातील कथित पेपरफुटीच्या प्रकरणांचा संदर्भ दिला. म्हाडा आणि टीईटी परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणांचा उल्लेख करत, “त्यावेळी रोहित पवार आमदार होते. त्यांनी काय केले?” असा सवाल त्यांनी केला. “विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी आम्हाला काही देणेघेणे नाही, तर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे, हे विद्यार्थ्यांनाही समजले आहे,” असा दावा बन यांनी केला.

रोहित पवार यांच्या राजकीय प्रवासावर वैयक्तिक टीका करत त्यांनी कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख केला. मात्र, अशा प्रकारच्या आरोपांबाबत संबंधित नेत्यांची बाजू किंवा स्वतंत्र पुष्टी पत्रकार परिषदेत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

BEST कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची अपेक्षा

दरम्यान, मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरही नवनाथ बन यांनी भूमिका मांडली. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असून मुंबईचे महापौर, महापालिका आयुक्त आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षा यावर तोडगा काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. योग्य तो तोडगा काढला जाईल आणि हा संप लवकरात लवकर मागे घेतला जाईल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा…

देवेंद्र फडणवीस आता आणखी पॉवरफुल! कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे

राज्यात ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, 2026’ अधिसूचित करण्यात आले असून, यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना अत्यंत महत्त्वाचे अधिकार मिळाले असून, मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांवर त्यांना थेट हस्तक्षेप करता येणार आहे. या नव्या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक हिताच्या बाबींमध्ये मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलू शकतात. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.