![]()
हिंगोली जिल्हयात चुकीच्या पद्धतीने झालेले निलंबन रद्द करावे तसेच वेतन वाढ रोखण्याचा निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी ग्राम पंचायत अधिकारी संघटनेने गुरुवारपासून ता. २० असहकार आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात २५० ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले आहेत. पुढील काळात आंदोलन आणखी तिव्र करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या जिल्हा शाखा व तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी सर्वच पदाधिकारी सहभागी झाले होते. हिंगोली जिल्हयातील ग्राम पंचायत अधिकाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. यामध्ये चुकीच्या पद्धतीने केलेले निलंबन रद्द करावे, वेतनवाढ रोखण्याची कारवाई रद्द करावी, निवानी व पुरावे नसलेल्या तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेऊ नये, अतिरिक्त ग्रामपंचायतचा पदभार असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अतिरिक्त मानधन द्यावे, विभागीय चौकशीमध्ये आलेल्या निर्णयावर सौम्य शिक्षा द्यावी, पात्र कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल देण्यात यावे, सन २०२२-२३ ते सन २०२५-२६ पर्यंतचे रखडलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरीत करावे, कालबध्द पदोन्नतीचा लाभ द्यावा यासह इतर मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांबाबत प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हयातील २५० ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून असहकार आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात प्रशासनाला तसेच शासनाने मागितलेली माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. तसेच सर्व शासकिय ग्रूपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनामुळे तुर्तास गावपातळीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नसला तरी माहितीच्या देवाण घेवाणीचे कामकाज ठप्प झाले आहे.
Source link
हिंगोलीत 250 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन:चुकीच्या पद्धतीने झालेले निलंबन रद्द करण्यासह इतर मागण्यांचा समावेश