Headlines

राजीव गांधींच्या विचारांची देशाला आजही गरज:बी. संदीप यांचे प्रतिपादन; जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण




माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सकारात्मक आणि विकासाभिमुख विचारांची देशाला आजही गरज आहे. त्यांच्या विचारांवर वाटचाल करून त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध झाले पाहिजे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. संदीप यांनी व्यक्त केले. राजीव गांधी स्मारक समितीतर्फे राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयासमोरील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. बी. संदीप यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीचा पाया घातला, तर राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणक क्रांतीचा पाया रचला. त्यांच्या संगणक क्रांतीमुळे भारतातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या. राजीव गांधी यांचे देशासाठीचे योगदान आणि बलिदान आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव रेहाना चिस्ती यांनीही आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या की, राजीव गांधी यांच्या सकारात्मक राजकारणामुळे देशात संगणक क्रांतीला चालना मिळाली. त्यांचे विचार युवकांपर्यंत पोहोचवून त्यांना राजकारणात सहभागी करून घेण्याची गरज आहे. पुणे शहर काँग्रेसच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. चौधरी म्हणाल्या की, राजीव गांधींसारखा दूरदृष्टीचा पंतप्रधान पुन्हा होणे कठीण आहे. त्यांनी आपल्या अल्प कार्यकाळात देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे परिवर्तन घडविले. नकारात्मक राजकारणाला सकारात्मक दिशेने बदलण्यासाठी राजीव गांधींच्या विचारांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा दळवी, सरचिटणीस राजेंद्र शेलार, भोला वांजळे आणि संजय वावले यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ काँग्रेसजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुभाष थोरवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *