![]()
पुण्यात २३ ऑगस्ट रोजी नारायण सेवा संस्थानतर्फे दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव रोपण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात ३६१ पूर्वनिवडीत लाभार्थींना ३डी-प्रिंटेड नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साधने दिली जाणार आहेत. उदयपूर येथील नारायण सेवा संस्थान, टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस आणि न्यूमन अँड एस्सार ग्रुप यांच्या सहकार्याने हे शिबिर होणार आहे. हे शिबिर टिंगरे नगर, रोड क्रमांक २, विश्रांतवाडी एअरपोर्ट रोड येथील तिरुपती मंगल कार्यालयात सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत होईल. सकाळी ११ वाजता शिबिराचे उद्घाटन होईल. यात केवळ पूर्वनिवड केलेले लाभार्थी सहभागी होऊ शकतील. संस्थानने दिलेल्या माहितीनुसार, २६८ दिव्यांग व्यक्तींना २७६ नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयव बसवले जातील. तसेच, ६० व्यक्तींना ८५ कॅलिपर्स आणि आवश्यक सहाय्यक साधने दिली जातील. या लाभार्थ्यांची निवड ५ जुलै रोजी झालेल्या मोफत अवयव मापन शिबिरात करण्यात आली होती. या शिबिरातील ३डी-प्रिंटेड मॉड्युलर कृत्रिम अवयव हे जपानी-जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. हे तंत्रज्ञान प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार अवयवातील विविध भाग बसवण्यास किंवा बदलण्यास मदत करते. यामुळे कृत्रिम अवयव अधिक आरामदायी आणि वापरण्यास सोपे होतात. अवयव बसवताना विशेष तांत्रिक पथकाकडून शरीराचा समतोल, चालण्याची पद्धत आणि वापरातील सुलभता तपासली जाईल. त्यानंतर लाभार्थ्यांना दैनंदिन जीवनात कृत्रिम अवयवांचा योग्य आणि सुरक्षित वापर करण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल. संस्थानचे आश्रम प्रभारी सुरेंद्र सिंग झाला यांनी सांगितले की, संस्थेचा उद्देश केवळ कृत्रिम अवयव देणे हा नाही, तर ते योग्य पद्धतीने बसवणे आणि त्यांचा प्रभावी वापर शिकवणे यालाही समान महत्त्व दिले जाते. यामुळे लाभार्थ्यांची गतिशीलता आणि स्वावलंबन वाढण्यास मदत होते. संस्थानचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांच्या मते, गरजू व्यक्तींचे जीवन अधिक सुलभ आणि स्वावलंबी करण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग झाला, तरच त्याचे खरे सार्थक होते. याच उद्देशाने ३डी प्रिंटिंग आणि मॉड्युलर तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिम अवयव अधिक अचूक आणि सोयीस्कर करण्यावर भर दिला जात आहे. संस्थानच्या माहितीनुसार, आतापर्यंत भारतासह परदेशातील ४० हजार ४०३ हून अधिक दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव देण्यात आले आहेत. तसेच, ४ लाख ५४ हजारांहून अधिक दिव्यांग व्यक्तींवर मोफत वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. या शिबिरात लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी भोजन, बसण्याची व्यवस्था आणि मूलभूत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Source link
पुण्यात 23 ऑगस्टला 361 दिव्यांगांना कृत्रिम अवयव:नारायण सेवा संस्थानतर्फे मोफत शिबिराचे आयोजन