![]()
कोराडी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा नागपूर गुन्हे शाखेने २४ तासांत छडा लावला आहे. पोलिसांनी २७ लाख ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोराडीतील केटीपीएस कॉलनी येथील रहिवासी संदीप वामनराव वानखेडे (४९) यांच्या घरात १६ ऑगस्ट रोजी रात्री २ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान चोरी झाली होती. याप्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा क्रमांक ३६६/२०२६ दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक ६ च्या पथकाने सुरू केला. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी शांतनू चंदू वानखडे (२३, रा. माधान, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) या आरोपीचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून सुमारे २३ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. यामध्ये सोन्याचे दोन नाणे, मंगळसूत्र, चैन, दोन बांगड्या, कानातील रिंग, आणखी सोन्याची नाणी व अंगठी यांचा समावेश आहे. तसेच चोरीसाठी वापरलेला विवो व्ही-७ मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. जप्त सोन्याची एकूण किंमत सुमारे २७ लाख ४८ हजार रुपये असून, मोबाईलसह एकूण मुद्देमालाची किंमत २७ लाख ७८ हजार रुपये आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी कोराडी पोलिस ठाण्यातील रात्रपाळी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Source link
कोराडीत घरफोडी, 27.78 लाखांचे सोने जप्त:आरोपी 24 तासांत जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई