![]()
अमरावती येथील वडाळीतील भोजने रुग्णालय आज, बुधवारी सील करण्यात आले. अल्पवयीन गर्भवती मुलीची माहिती पोलिसांपासून लपवून तिच्या नवजात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही कारवाई झाली. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी पोलीस संरक्षणात ही कारवाई केली. १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला होता. मात्र, डॉक्टर दाम्पत्याने हे बाळ विकण्याचा कट रचला. शिवसेनेच्या वर्षा भोयर आणि कोमल बद्रे यांच्या तक्रारीनंतर हा कट उघड झाला. नियमानुसार, अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणेची माहिती डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना कळवणे बंधनकारक आहे. डॉक्टरांनी आर्थिक फायद्यासाठी नियम मोडले. फ्रेजरपुरा पोलिसांनी डॉ. वैशाली भोजने, त्यांचे पती आणि मुलीला गर्भवती करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच भोजने दाम्पत्य फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यातील आर्थिक व्यवहारांची सत्यता तपासण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. पुढील कारवाईसाठी हा अहवाल गर्भलिंग निदान प्रतिबंधक समितीसमोर ठेवला जाईल.
Source link
अल्पवयीन मुलीच्या बाळाची विक्री:अमरावतीत भोजने रुग्णालय सील, डॉक्टर दाम्पत्य फरार; पुढील दिशा आज ठरणार