![]()
ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ज्येष्ठ स्थापत्य अभियंता आर. बी. सूर्यवंशी यांनी सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेतला आहे. त्यांनी वैयक्तिक खर्चातून आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बी.आय.ए.), पुणे सेंटरच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील १९ शाळांमध्ये स्वच्छतागृहे उभारली आहेत. या उपक्रमाचा आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थिनींना लाभ झाला आहे. पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथील डॉ. शंकरराव कोलते विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मुलींसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे नुकतेच शाळेकडे हस्तांतरण करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या सुविधेमुळे विद्यार्थिनींची गैरसोय दूर होण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो, ही बाब लक्षात घेऊन सूर्यवंशी यांनी २०१३ पासून हा उपक्रम सुरू केला. त्यांनी स्वतःच्या खर्चातून १२, तर बी.आय.ए. पुणे सेंटरच्या माध्यमातून सात स्वच्छतागृहे बांधून दिली आहेत. भोर, खेड, बारामती, शिरूर, वेल्हे, आंबेगाव, पुरंदर आणि पुणे तालुक्यातील शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘मुलींच्या साक्षरतेतच संपूर्ण समाजाचे हित आहे. स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांअभावी विद्यार्थिनींचे शिक्षण थांबू नये. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांनी या कामाकडे प्रशासकीय औपचारिकता म्हणून न पाहता राष्ट्रीय मोहीम म्हणून लक्ष द्यावे,’ असे सूर्यवंशी यांनी सांगितले. शाळांच्या इमारतींच्या आराखड्यात विद्यार्थिसंख्येनुसार पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थेसह स्वच्छतागृहांची तरतूद असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या सुविधा नसलेल्या इमारतींचे नकाशे मंजूर करू नयेत आणि प्रत्यक्ष कामाची खात्री केल्यानंतरच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
Source link
ज्येष्ठ अभियंता आर.बी.सूर्यवंशी यांनी 19 शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधली:2013 पासून सुरू असलेल्या उपक्रमामुळे साडेतीन हजार विद्यार्थिनींना फायदा; पिसर्वे शाळेत हस्तांतरण