![]()
आपल्या आयुष्यातील काही जागा या केवळ वास्तूंपूरत्या मर्यादित नसून त्या वास्तू आपल्या आठवणी, संस्कार आणि व्यक्तिमत्व जडणघडणीचा अतिभाज्य भाग झालेल्या असतात. बीएमसीसी महाविद्यालयातील टाटा सभागृहाशी माजी विद्यार्थ्यांचे हेच भावनिक नाते असून टाटा सभागृहाच्या नूतनीकरणासाठी बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटना सरसावली आहे. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी यासाठी भरीव योगदान द्यावे असे आवाहन बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण, उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य दिपक पॉडेल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी माजी विद्यार्थी संघटना सदस्य सुरेंद्र देशमुख, उपाध्यक्ष सुरेश केकाणे, सचिव सुहास पटवर्धन, खजिनदार सुहास धारणे, बाळासाहेब मारणे आणि ग्राहकपेठेचे सूर्यकांत पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विद्याधर अनास्कर म्हणाले की, संस्थेच्या टाटा सभागृहाचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करून ते अधिक देखणे आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी बनविण्याचा संकल्प माजी विद्यार्थी संघटनेने केला असून या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी सुमारे ३ कोटी इतका निधी लागणार आहे. या उपक्रमात योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींची नावे टाटा हॉलच्या बाहेर उभारण्यात येणाऱ्या “बीएमसीसी माजी विद्यार्थी लिगसी वॉल” वर सन्मानपूर्वक नोंदविण्यात येणार आहेत. याद्वारे आपले नाव पुढील पिढ्यांनाही पाहता येईल आणि आपल्या महाविद्यालयाशी असलेले आपले नाते चिरंतन स्मरणात ठेवता येईल. प्रत्येक माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या क्षमतेनुसार या उपक्रमात सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण, उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य दिपक पॉडेल यांनी यावेळी केले. ५० लाख किंवा त्यापेक्षा अधिकची मदत करणाऱ्यास फांऊंडिंग बेनिफॅक्टर या वर्गवारीतून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच लिगसी, डायमंड, गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रांझ दाता अशा विविध वर्गवारीतून माजी विद्यार्थी अनुक्रमे २५ लाख ते ५० लाख, १५लाख ते २४.९९ लाख, ५ लाख ते १४.९९लाख, २लाख ते ४.९९ लाख आणि १लाख ते १.९९लाख अशा स्वरूपात मदत करू शकतात. एक लाखापेक्षा कमी देणगी देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची “अल्युमिनाय सपोर्टस” म्हणून विशेष यादी करण्यात येणार आहे.बीएमसीसी महाविद्यालयाला दीर्घ अभिमानास्पद इतिहास लाभलेला असून या महाविद्यालयातून शिकून अनेकांनी देशाच्या आर्थिक विकासात योगदान दिले आहे. बीएमसीसीचा आजवरचा प्रवास हा केवळ एका शैक्षणीक संस्थेचा प्रवास नसून राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाने प्रेरित असलेल्या शिक्षणपरंपरेचा, दूरदृष्टीचा, दातृत्वाचा आणि ज्ञानसाधनेचा गौरवशाली वारसा आहे. या संस्थेने अनेक पिढ्यांतील विद्यार्थ्यांना वाणिज्य, अर्थशास्त्र, उद्योग, व्यवसाय आणि सामाजिक जीवनात योगदान देण्यासाठी सक्षम आणि समर्थ केले आहे.
Source link
बीएमसीसी टाटा सभागृहाच्या नूतनीकरणासाठी 3 कोटींचा निधी लागणार:माजी विद्यार्थी संघटनेने भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी बनवण्याचा संकल्प केला, योगदानाचे आवाहन