Headlines

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अपमानाचा निषेध:पुण्यात संविधान संवर्धन समितीचे धरणे आंदोलन




उत्तराखंडमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा दलित म्हणून अपमान केल्याच्या निषेधार्थ पुण्यात भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय संविधानवादी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध केला. या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार जयदेव गायकवाड, काँग्रेस पक्ष अनुसूचित जाती विभागाचे पुणे (पूर्व विभाग) शहराध्यक्ष आणि आंदोलनाचे मुख्य समन्वयक कुणाल राजगुरू, माजी नगरसेविका लता राजगुरू, विठ्ठल गायकवाड, शैलेंद्र मोरे, संग्राम रोहम, वसंत साळवे, रोहिदास गायकवाड, रवींद्र माळवदकर यांच्यासह अनेक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना उल्हास पवार यांनी सांगितले की, मल्लिकार्जुन खर्गे यांना लहानपणापासून सामाजिक विषमतेचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना जाळून मारण्यात आले होते. तरीही खचून न जाता त्यांनी मोठे कर्तृत्व गाजवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी, घटना, उद्दिष्ट आणि पार्श्वभूमी यावर प्रश्न उपस्थित करण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. समाजासाठी उपयुक्त आणि क्रांतिकारक ठरतील असे अनेक निर्णय त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत घेतले आहेत. ते विद्वान, बहुभाषिक आणि घटनात्मक पदावर असतानाही केवळ दलित म्हणून त्यांचा अवमान करणे सहन केले जाणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला. माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी आपल्या भाषणात काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा पक्ष असल्याचे म्हटले. काँग्रेसने स्थापनेपासूनच सामाजिक समतेचा पुरस्कार केला आहे. काँग्रेसच्या दरवर्षीच्या अधिवेशनानंतर सामाजिक परिषद आयोजित केली जात असे, ज्यात सामाजिक विषमता मोडून काढून समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने विचारमंथन होत असे. स्वातंत्र्यानंतर अस्पृश्यता निर्मूलनाला प्राधान्य देण्यात आले, असेही गायकवाड म्हणाले. सध्याच्या काळात सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला काँग्रेस हाच एकमेव पर्याय ठरू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. उत्तराखंडमधील हलदानी येथील रामलीला मैदानावर मल्लिकार्जुन खर्गे विजय शंखनाद रॅलीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर काही जातीयवादी शक्तींनी गोमूत्र शिंपडून रामलीला मैदान ‘पवित्र’ केल्याचा दावा केला होता. या कृत्याचा निषेध करण्यासाठी हे प्रातिनिधिक धरणे आंदोलन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *