![]()
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त पुणे येथील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी विवेकाचा अहिंसक लढा, मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला. याच प्रसंगी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन – मुलांमध्ये कसा विकसित करायचा?’ या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी लिहिलेल्या या पुस्तिकेचे प्रकाशन ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अरविंद गुप्ता यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रमुख उपस्थित होते. डॉ. दाभोलकर यांची हत्या याच पुलावर झाली होती, हे विशेष. डॉ. गुप्ता यांनी यावेळी डॉ. दाभोलकर यांच्या कार्याचे स्मरण केले. वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्याचा दाभोलकरांचा आग्रह होता. त्यांनी मांडलेले विवेकवादी विचार शाश्वत असून, ही लढाई पुढे नेण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन डॉ. गुप्ता यांनी केले. हर्षवर्धन सपकाळ यांनी डॉ. दाभोलकर यांच्या सहवासातून आणि विचारांतून आपल्यामध्ये विवेकवाद कसा रुजला, याच्या आठवणी सांगितल्या. पुढील वर्षभरात या विषयावर लिखाण करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक गिरमे, गणेश चिंचोले, प्रवीण देशमुख, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, श्रीपाल ललवाणी, राहुल थोरात, लेखक प्रभाकर नानावटी, नाट्यकर्मी अतुल पेठे, छायाचित्रकार मिलिंद जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. परिवर्तन संस्थेचे समुपदेशक राजू इनामदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी चळवळीची आणि डॉ. दाभोलकरांना अभिवादन करणारी गाणी सादर केली.
Source link
दाभोलकर स्मृतीदिनी 'वैज्ञानिक दृष्टिकोन' पुस्तिकेचे प्रकाशन:अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विवेकाचा लढा पुढे नेण्याचा केला निर्धार