Headlines

लोणावळा 'ग्लास स्कायवॉक' निविदा मसुदा अंतिम:प्रसिद्धीचा मार्ग मोकळा, प्रकल्पाला जिल्हास्तरीय समितीकडून गती




लोणावळ्याला येणाऱ्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरणाऱ्या कुरवंडे परिसरातील टायगर आणि लायन्स पॉईंट येथे प्रस्तावित १२५ मीटर लांबीच्या बहुप्रतीक्षित ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला आता मोठी प्रशासकीय गती मिळाली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या निविदेचा मसुदा अंतिम करण्यात आला असून, लवकरच यासाठी ‘आरएफपी’ (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात गुरवारी पार पडलेल्या निविदा छाननी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी उपस्थित होते. बैठकीत पीपीपी तत्त्वावरील निविदेच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. हा मसुदा पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यास तसेच मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकल्पाला आवश्यक तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून, दर विश्लेषणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत अंतिम तांत्रिक मान्यतेसह प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. ‘पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ परिसर विकास’ योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात २३ मीटर लांबीच्या ‘कँटिलीव्हर’ भागासह १२५ मीटर लांबीच्या काचेच्या पुलाचा समावेश आहे. याशिवाय, पर्यटकांसाठी आकर्षक प्रवेशद्वार, व्ह्यूइंग गॅलरी, भव्य रेस्टॉरंट, आधुनिक पार्किंग व्यवस्था, स्वतंत्र वीज उपकेंद्र, सुसज्ज स्वच्छतागृहे आणि परिसराचे व्यापक सुशोभीकरण केले जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *