![]()
अमरावती जिल्ह्याचे महसूल प्रशासन सध्या कर्तव्यकठोर भूमिकेत आले आहे. गेल्या २४ तासांत एका महिला तलाठ्याला (ग्राम महसूल अधिकारी) बडतर्फ करण्यात आले असून, दुसऱ्या तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे. तिसरा तलाठीही रडारवर असून, याबाबत एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती आहे. बडतर्फी आणि निलंबनाचे हे दोन्ही आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी बजावले आहेत. बडतर्फ करण्यात आलेल्या महिला तलाठ्याचे नाव अश्विनी किसन येळे आहे. त्या अनेक दिवसांपासून गैरहजर होत्या. त्यांच्याकडे तिवसा तालुक्यातील सालोरा साझाची जबाबदारी होती. सन २०२१ मध्ये नऊ दिवसांची रजा घेतल्यानंतर त्या कामावर परतल्याच नाहीत. कर्तव्यातील या गैरवर्तणुकीबद्दल त्यांना वेळोवेळी विचारणा करण्यात आली, परंतु त्यांनी कधीही प्रत्युत्तर दिले नाही. त्यांची सेवा १० ऑक्टोबर २०२५ रोजी पुनर्स्थापित करून त्यांना वरुड तालुक्यातील वाडेगाव साझाची जबाबदारी देण्यात आली होती, तरीही त्या रुजू झाल्या नाहीत. दीर्घकाळ विनापरवानगी गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाचा अनादर करणे आणि पुनर्स्थापनेनंतरही सेवेत रुजू न होणे या कारणास्तव त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या दुसऱ्या एका आदेशानुसार, तलाठी अजय रामधरसिंग चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. चव्हाण यांच्याकडे अमरावती शहरातील शेगाव, गंभीरपूर, तारखेडा, अकोली आणि तालुक्यातील वडगाव (नांदगाव पेठ) या साझांची जबाबदारी होती. त्यांनी विविध फेरफार प्रकरणांमध्ये आदेशानुसार आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केली नाहीत, तसेच काही प्रकरणांमध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांचे आदेश किंवा आवश्यक आधार नसतानाही नोंदी घेतल्याचे चौकशी अहवालात नमूद आहे. चव्हाण यांच्या गैरप्रकाराची तक्रार मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (SDO) नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली होती, ज्या समितीने हा अहवाल सादर केला. याच संदर्भात, तहसीलदारांचे अधिकार वापरून जमिनीच्या प्रकरणात आदेश बजावणाऱ्या अमरावती येथील नायब तहसीलदार टिना चव्हाण यांना शासनाने गेल्या आठवड्यात निलंबित केले होते. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, दररोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. टिना चव्हाण यांच्या चुकीच्या आदेशाची अंमलबजावणी करत फेरफार करणारे मंडळ अधिकारी यशवंत मधुकर चतुर आणि तलाठी स्मिता अनंत लोखंडे या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
Source link
अमरावतीत 24 तासांत महसूल विभागाची मोठी कारवाई:एक तलाठी बडतर्फ, दुसरा निलंबित; तिसरा रडारवर