Headlines

जंतरमंतर वरील आंदोलनानेच युवकांनी क्रांतीची मशाल पेटवली:कॉ. वैभव चोपकर यांचे प्रतिपादन, कॉ. शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना साताऱ्यात अभिवादन




आजची तरुण पिढी वाया गेलेली आहे. रिल्स पाहणारी पिढी, तासनतास मोबाईलच्या आहारी गेलेली अशी टीका करणारे सूर समाजात सर्रास पाहायला मिळतात. परंतु त्याच मोबाईलच्या व्यसनाने रस्त्यावरच्या लढाईला बळ दिलं आणि जंतर मंतरवरील आंदोलनाने या देशात पुन्हा एकदा युवकांनी क्रांतीची मशाल पेटवली व ही तरुण पिढी आगामी काळात मनुवादी, जातीवादी व भांडवलदारी शक्तीला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा स्पष्ट इशारा नवी दिल्ली येथील जंतर मंतर वरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे एक नेते व AISFचे राज्य संयोजक कॉ. वैभव चोपकर यांनी सातारा येथे बोलताना दिला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्मृतीशेष कॉ. शेख बंडू इनामदार उर्फ कॉ. शेख काका व स्मृतीशेष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी वैभव चोपकर बोलत होते. यावेळी या विद्यार्थी आंदोलनातीलच एक नेत्या श्रावणी बाळ याही उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सुटाचे अध्यक्ष व एमफुक्टो चे महासचिव प्रा. डॉ. आर के चव्हाण होते. ‘जेन झी आंदोलनाची नवीन राजकीय भाषा आणि पुढील दिशा’ या विषयावर या दोघांनी मनोगते व्यक्त केली. प्रारंभी कॉ शेख काका व डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी अभिवादन केले. वैभव चोपकर यांनी आपल्या भाषणात एनटीए बरखास्त करावे, पेपर फुटू नयेत म्हणून केंद्र सरकारने एक कायदा आणला आहे. परंतु मूळ मुद्द्यावर केंद्र सरकार लक्ष देत नाही. केंद्र सरकारची शिक्षण, रोजगार शिक्षण माफीया यांच्या संदर्भातली दुहेरी व दुहेरी भूमिका आहे असाही आरोप केला आहे. श्रावणी बाळ यांनी जंतर मंतरवरील आंदोलनाच्या परिस्थितीची माहिती दिली. आंदोलन चिरडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुंडांचा वापर केला, असा आरोप केला आणि प्रत्यक्ष वस्तू स्थितीची माहिती सांगितली आणि पोलिसी अत्याचार कथन केला. आम्ही केंद्रातल्या सरकारला दाखवून दिले की युवाशक्ती आता गप्प बसणार नाही त्यांच्या नादाला तुम्ही लागू नका. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा डॉ आर के चव्हाण म्हणाले की, या पोरांनी सर्वात महत्त्वाची कोणती क्रांती केली असेल तर ती म्हणजे या शासन व्यवस्थेच्या बद्दलची सामान्य माणसाच्या मनात व विरोधी राजकीय पक्षांच्या मनात जी भीती बसली होती ती दूर केली आणि शालेय वयातील झेन अल्फा म्हणविल्या जाणाऱ्या पिढीला त्यांच्या शैक्षणिक हक्काची जाणीव करून दिली. हे या आंदोलनाचे यश म्हटले पाहिजे. प्रास्ताविक करताना विजय मांडके यांनी कॉ शेख काका व डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचा आढावा घेताना या दोघांनीही युवक असताना सामाजिक परिवर्तनाच्या व व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीत कसा भाग घेतला व त्याचेच पुढील कार्य हे युवक करत आहेत असे सांगितले. मिनाज सय्यद यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला. उदय चव्हाण यांनी आभार मानले. प्रणव पवार यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कलाकार किरण माने हे आवर्जून उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *