![]()
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देशातील साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीवर चिंता व्यक्त केली आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण करून काही मोजक्या साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांना फायदा मिळवून दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. साखरेच्या दरातील ही तेजी पुढील तीन महिने कायम राहिल्यास सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त नफा काही मोजक्या व्यापारी व कारखानदारांच्या पदरात पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. देशातील साखरेचा उपलब्ध साठा आणि बाजारातील मागणी याची संपूर्ण माहिती केंद्र सरकारकडे आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत देशात सुमारे 65 ते 70 लाख मेट्रिक टन साखरेचा खप होतो. या काळात एकूण उत्पादनाच्या सुमारे 25 ते 30 टक्के साखर बाजारात येते. बाजारात पुरेसा साठा असतानाही साखरेचे दर वाढत असल्याने कृत्रिम तुटवड्याचा संशय निर्माण होत असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. तीन महिन्यांपूर्वी साखरेचा दर प्रतिक्विंटल सुमारे 3800 रुपये होता. आता तो 7000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेषतः गेल्या आठ दिवसांत सुमारे 45000 रुपयांवरून दर 7000 रुपयांपर्यंत वाढल्याचा दावा शेट्टी यांनी केला. केंद्र सरकारने देशातील प्रत्येक साखर कारखान्याकडील शिल्लक साठ्याची कारखानानिहाय माहिती तातडीने तपासावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. पुरवठा विभागामार्फत कारखान्यांवर धाडी टाकून प्रत्यक्ष साखर साठ्याची पडताळणी करावी. तसेच, कारखान्यांमधील अधिकृत साठ्याव्यतिरिक्त साखर साठवली जात आहे का, कमी दराने खरेदी केलेली साखर, काटामारी किंवा उताऱ्यातील गैरप्रकारातून अतिरिक्त साखर निर्माण झाली आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. साखरेच्या सध्याच्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाल्यास त्यांना प्रतिटन सरासरी 1000 ते 1200 रुपयांचा अतिरिक्त हप्ता देणे शक्य असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. मात्र, कृत्रिम तुटवडा निर्माण करून तेजीच्या बाजारात साखर विकली गेली आणि भविष्यात दर नियंत्रणाच्या नावाखाली साखर आयात करण्यात आली, तर पुढील हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे दर पुन्हा 32 ते 35 रुपये किलोपर्यंत घसरण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. साखरेच्या दरवाढीमागे केंद्रातील कोणत्या बड्या नेत्याचा राजकीय आशीर्वाद आहे, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचेही शेट्टी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आरोपांमुळे साखर बाजारातील दरवाढ, उपलब्ध साठा आणि ऊस उत्पादकांना मिळणारा आर्थिक लाभ यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी जोर धरू शकते.
Source link
साखरेच्या बाजारात 20-22 हजार कोटींच्या काळ्या बाजाराची शक्यता:राजू शेट्टींचा आरोप, म्हणाले- मुठभर व्यापारी-कारखानदारांसाठी जनतेला वेठीस धरले