![]()
काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींच्या २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला विरोध करणारे तेच लोक आहेत, ज्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड आणि शेण फेकले होते, असे कन्हैयाकुमार म्हणाले. राहुल गांधी पुण्यात सावित्रीच्या लेकींशी संवाद साधणार आहेत. कन्हैयाकुमार यांच्या मते, राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यामुळे भाजपने धसका घेतला आहे. त्यामुळेच ते कार्यक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने कितीही अडवणूक केली किंवा अपप्रचार केला तरी ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कन्हैयाकुमार यांनी भाजप सरकारच्या शैक्षणिक धोरणांवरही जोरदार टीका केली. मनुवादी विचारांनी देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. देशात दर तासाला दोन जवान आत्महत्या करत आहेत, २५ शाळा बंद होत आहेत आणि अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडत आहेत, असे ते म्हणाले. ‘ना पढे है, ना पढने देंगे’ हे भाजपचे धोरण असून, त्यांचे पदवी प्रमाणपत्रही बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप नेत्यांची मुले परदेशात शिक्षण घेत असल्याने त्यांना या परिस्थितीचा फरक पडत नाही, असेही कन्हैयाकुमार म्हणाले. आज शिक्षण महागडे झाले असून ते सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पदवीसाठी ३० लाख रुपये खर्च करावे लागत असतील आणि ८० कोटी जनता ५ किलो धान्यावर जगत असेल, तर त्यांना हे महागडे शिक्षण कसे परवडणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खाजगी शाळांना आमचा विरोध नाही, पण सरकारी शाळा बंद होता कामा नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. महागडे शिक्षण घेऊनही नोकरीची शाश्वती नाही. परीक्षांचे पेपर फुटत आहेत आणि या सरकारला दहावीची परीक्षाही व्यवस्थित घेता येत नाही. सीबीएसईच्या परीक्षेतही घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षण हा आमचा अधिकार आहे, तो विशेषाधिकार बनवला जात आहे, असे कन्हैयाकुमार यांनी नमूद केले. कन्हैयाकुमार यांनी पुन्हा एकदा सांगितले की, राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचा भाजपने धसका घेतला आहे. कोटा येथून सुरू झालेल्या या कार्यक्रमांना प्रत्येक वेळी अडवण्याचा प्रयत्न झाला, पण ते सर्व कार्यक्रम यशस्वी झाले. पुण्यातही परवानगी देताना अनेक अटी घालण्यात आल्या आहेत, पण अशा प्रयत्नांनी कार्यक्रम थांबणार नाही, तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल यात शंका नाही, असे ते म्हणाले. भाजपने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करून ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाबद्दल अपप्रचार सुरू केला आहे, पण या कार्यक्रमाला पैसे देऊन कोणाला आणण्याची गरज नाही, लोक स्वतःहून येत आहेत, असे कन्हैयाकुमार यांनी स्पष्ट केले. कितीही अडथळा आणला तरी राहुल गांधी येणार आणि कार्यक्रमही होणारच. राहुल गांधी अमित शाह यांच्यासमोर झुकले नाहीत, तर फडणवीस यांच्यासमोर कशाला झुकतील, असा सवालही त्यांनी केला.
Source link
कन्हैयाकुमार म्हणाले- 'छात्रों की गुंज' विरोधक सावित्रीबाईंवर दगडफेक करणारेच:राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वी भाजपवर गंभीर आरोप