![]()
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत असोसिएशनचे कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने २३ जिल्ह्यांच्या सचिवांसह तांत्रिक समितीला लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. बदलत्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे काळाची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले. त्या म्हणाल्या की, लॅपटॉपमुळे पेपरलेस कामकाजाला सुरुवात होईल. खेळ आणि खेळाडूंच्या सन्मानासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. दिवंगत अजित दादांनी खो-खो खेळाच्या प्रगतीसाठी तळमळीने प्रयत्न केले. त्यांच्याच संकल्पनेतून पेपरलेस कामकाजासाठी लॅपटॉप वितरण होत असल्याचेही पवार यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला असोसिएशनच्या उपाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस डॉ. चंद्रकांत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा, शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त जनार्दन शेळके, अर्जुन पुरस्कार प्राप्त सुरेखा कुलकर्णी आणि श्रीरंग इनामदार उपस्थित होते. कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा दरवर्षी महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा बारामती येथे होणार असून, असोसिएशनने स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करावी, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले. यावेळी असोसिएशन अंतर्गत अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, पालघर, परभणी, पुणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे येथील सचिवांकडे लॅपटॉप सुपूर्द करण्यात आले.
Source link
सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत खो-खो असोसिएशनची बैठक:कामकाज पेपरलेस करण्यासाठी 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप