Headlines

नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांची आजच्या पिढीला गरज:धर्मांध राजकारणाला नकार देण्याचे आवाहन, गायकवाड यांचे मत




डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्यावरील पुस्तिका संचाचे प्रकाशन नुकतेच झाले. याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ सनदी अधिकारी संग्राम गायकवाड यांनी आजच्या पिढीला नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी धर्मांध राजकारणाला नकार देण्याचे आवाहनही केले. गायकवाड म्हणाले की, सध्या कट्टर विचारप्रवाह समाजात वाढत असून द्वेषाची भाषा आणि धर्मांध राजकारण सामान्य होत आहे. अशा परिस्थितीत ‘जेन झी’ पिढीचे आंदोलन दिलासादायक आहे, कारण ही पिढी निर्भयपणे धर्मांध राजकारणाला नाकारत आहे. त्यामुळे या पिढीला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा निश्चितच उपयोग होईल. मराठवाडा मित्रमंडळाच्या ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना गायकवाड यांनी या चारही विचारवंतांना समाजासाठी दीपस्तंभासारखे संबोधले. त्यांच्या हत्यांमागे सनातन संस्थेचा हात असल्याचे तपासात समोर आले आहे. आज हिंदू धर्माचे एकजिनसीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून, विशिष्ट समाजघटकाविषयी जाणीवपूर्वक द्वेष निर्माण केला जात आहे, ही संविधानप्रेमी नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले. प्रशासकीय यंत्रणांच्या निःपक्षपातीपणाबाबतही प्रश्न उपस्थित होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या पुस्तिका संचाचे प्रकाशन ज्येष्ठ सिने दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले की, समाजमाध्यमांवर विचार मांडणाऱ्यांवर गरळ ओकणारी यंत्रणा सक्रिय आहे. अशा वेळी दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या कार्याची वस्तुनिष्ठ माहिती देणाऱ्या पुस्तिकांची आज नितांत गरज आहे. या पुस्तिका वाचून त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास करावा, ज्यामुळे चिकित्सक आणि मानवतावादी दृष्टी विकसित होईल. सुकथनकर यांनी पुढे सांगितले की, धर्म सुरुवातीला चांगुलपणासाठी निर्माण झाला होता. मात्र, त्यात साचलेपणा आल्यावर त्याला प्रवाही करण्यासाठी दाभोलकरांसारख्या विचारवंतांची आवश्यकता असते. मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी आपल्या भाषणात दाभोलकरांसारखे विचारवंत शोषण करणाऱ्या रूढी-परंपरांना विरोध करतात, असे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हमीद दाभोलकर यांनी केले, तर राहुल थोरात यांनी सूत्रसंचालन केले. श्रीपाल ललवाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच महाराष्ट्र अंनिसचे मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, गणेश चिंचोले, अनिल वेल्हाळ, दत्तात्रय जाधव, प्रवीण देशमुख, राहुल माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *