Headlines

अंतरवाली सराटीत राजकीय खलबते!:अब्दुल सत्तार थेट जरांगेंच्या भेटीला; 29 ऑगस्टच्या उपोषणापूर्वी मध्यस्थीचा प्रयत्न?




मराठा आरक्षणाच्या पेटत्या लढ्यादरम्यान जालन्यातील अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. आगामी 29 ऑगस्टच्या उपोषणाची घोषणा झाल्यानंतर वातावरणातील उष्णता वाढली असतानाच, शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी अचानक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. नुकतेच संजय शिरसाट यांच्यावर जरांगेंनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर सत्तारांच्या या सरप्राइज एंट्रीने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सत्तार या भेटीतून मध्यस्थीचा प्रयत्न करत आहेत का, अशी चर्चाही या निमित्ताने सुरू झालीय. ‘मी इथे मित्र म्हणून आलोय…’ : सत्तारांची नमती भूमिका सरकारच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी आणि आगामी आंदोलनाची तीव्र ताकद कमी करण्यासाठी सत्तार अंतरवालीत पोहोचल्याची चर्चा रंगली आहे. चर्चेदरम्यान अब्दुल सत्तार यांनी नमती आणि समंजस भूमिकाघेतल्याचे दिसले. जरांगेंना शांत राहण्याचे आवाहन करत सत्तार म्हणाले, ‘मी इथे कोणत्याही राजकीय हेतूने नाही, तर एक मित्र म्हणून आलो आहे. संघर्ष टळावा हीच विनंती आहे. सरकार दोन पावले मागे-पुढे येण्यास तयार आहे, त्यामुळे तुम्हीही थोडा विचार करावा. समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार नक्कीच घेईल.’ जरांगेंचा थेट शिंदेंवर निशाणा; ‘चूक सुधारा’ असा थेट इशारा या भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या धोरणांवर सडकून टीका करत जरांगे यांनी थेट सत्तारांसमोरच भाष्य केले. एकनाथ शिंदेंबाबत तक्रार “जे काही चुकतेय, ते वेळेत दुरुस्त करा,” असा रोकठोक सल्ला जरांगेंनी सत्तारांना दिला. फडणवीस आणि शिंदे सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त करत, आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर न सुटल्यास आंदोलन तीव्र होईल, असे संकेत जरांगेंनी दिले. अंतरावलीतून थेट ‘मुंबई मार्च’चा इशारा या संपूर्ण भेटीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे 29 ऑगस्टपासून सुरू होणारे उपोषण. उपोषणाच्या ठिकाणाबाबत असलेल्या सर्व शंकांना पूर्णविराम देत मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले की, ‘उपोषण अंतरवाली सराटीतच होईल. उपोषण सुरू असतानाच जर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर आम्ही तिथूनच थेट मुंबईकडे कूच करू!’. आता चेंडू सरकारच्या कोर्टात! सत्तारांच्या या मध्यस्थीनंतर आणि जरांगेंनी दिलेल्या अंतिम इशाऱ्यामुळे आता राज्य सरकार २९ ऑगस्टपूर्वी काही ठोस निर्णय घेणार का, की मराठा आरक्षणाचा हा लढा पुन्हा एकदा मुंबईच्या वेशीपर्यंत धडकणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *