Headlines

मुंबईतील 15 पोलिस ठाण्यांच्या हद्दींची नव्याने आखणी:हद्दीचे वाद मिटणार, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण होणार अधिक सुलभ




मुंबईत गुन्हा घडल्यानंतर अनेकदा “घटना आमच्या हद्दीत घडली नाही” या कारणावरून पोलिसांमध्ये होणारा हद्दीचा वाद आणि नागरिकांची होणारी ससेहोलपट आता कायमची थांबणार आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने मुंबईतील १५ महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रांची नव्याने पुनर्रचना केली असून यासंदर्भातील अधिकृत राजपत्र जारी केले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (बीएनएसएस) मधील तरतुदींनुसार हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या नागरीकरणामुळे आणि नवीन पायाभूत सुविधांमुळे पोलीस ठाण्यांच्या हद्दीबाबत निर्माण होणारा संभ्रम दूर करण्यासाठी जुन्या सर्व अधिसूचना रद्द करण्यात आल्या आहेत. नव्या रचनेनुसार दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि डी.बी. मार्ग या संवेदनशील ठाण्यांसह उपनगरातील भांडुप, पार्कसाईट, महाराष्ट्र नगर, वाकोला, निर्मलनगर, गोळीबार, मालवणी, मढ-मार्वे, घाटकोपर, साकीनाका, असल्फा, पवई आणि एम.आय.डी.सी. या पोलीस ठाण्यांच्या चारही दिशांच्या सीमांची नव्याने आखणी झाली आहे. या सीमांकनात प्रमुख रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो स्थानके, रेल्वे ट्रॅक आणि नैसर्गिक जलवाहिन्यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. गृह विभागाचे उपसचिव अजित म. कवडे यांच्या आदेशाने ही अधिसूचना लागू करण्यात आली आहे. यामुळे तक्रारदारांना नेमक्या कोणत्या पोलिस ठाण्यात जायचे हे स्पष्ट होईलच, शिवाय पोलिसांनाही पेट्रोलिंग आणि गुन्हे तपासात सुसूत्रता आणता येईल. नेमका काय बदल झाला? मुंबईतील पोलीस ठाण्यांच्या सीमा जुन्या अधिसूचनांनुसार अस्तित्वात होत्या. अनेक वर्षांतील वाढती बांधकामे, मेट्रो मार्ग आणि नवीन वस्त्यांमुळे हद्दीचे स्पष्ट सीमांकन नसल्याने गुन्हा नोंदवताना व तक्रारदारांना हद्दीच्या वादाचा मोठा सामना करावा लागत होता. त्यामूळे शासनाने मागील सर्व जुने आदेश रद्द करून १५ पोलीस ठाण्यांच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण सीमांची अचूक व आधुनिक भौगोलिक खूणांनुसार पुनर्रचना केली आहे.यामुळे हद्दीचा वाद मिटून थेट आणि जलद न्याय मिळणे शक्य होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *