Headlines

राहुल गांधी- महिलांना दडपण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली:पुण्यात म्हणाले, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध




पुणे येथे झालेल्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिलांना दडपून ठेवण्याच्या मानसिकतेवर जोरदार हल्ला चढवला. ही मानसिकता ‘मनुस्मृती’तून आली असून, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. राहुल गांधी यांचा हा देशातील चौथा ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम होता, जो हजारो मुलींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. भाजपने हा कार्यक्रम यशस्वी होऊ नये यासाठी अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मुलींना कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी धमक्या देण्यात आल्या आणि हिंसक घटना घडवून आणल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी यांचे दुपारी पुण्यात आगमन झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान आणि यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर संध्याकाळी राहुल गांधी यांनी कार्यक्रमात मुलींशी संवाद साधून त्यांच्या समस्या व व्यथा जाणून घेतल्या. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोक मुली आणि स्त्रिया पिंजऱ्यातच बंदिस्त राहाव्यात अशा मानसिकतेचे आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. मात्र, आपल्याला असा भारत नको आहे, जिथे प्रत्येकाशी आदराने वागले जाईल अशी व्यवस्था हवी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता ‘मनुस्मृती’तून आली असून, आज आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांनी देशातील महिलांच्या स्थितीबद्दल भाष्य करताना त्यांचे हक्क कसे नाकारले जातात हे सांगितले. हजारो वर्षांपासून महिलांना त्यांचे हक्क व अधिकार नाकारण्यात आले आहेत. मनुस्मृती महिलांना स्वतंत्र असू नये असे म्हणते, पण महिलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे, त्यातच मोठी ताकद आहे, असे ते म्हणाले. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. मुलीचे वडील, भाऊ, पती किंवा मुलगा यांच्याशी नाते असू शकते, पण त्या त्यांची मालमत्ता नाहीत, त्या स्वतःच्या आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. समाजात महिलांना प्रगती करण्यापासून रोखण्यासाठी हिंसाचाराचा वापर केला जातो, असे राहुल गांधींनी सांगितले. या हिंसाचाराचे त्यांनी तीन प्रकार सांगितले. शारीरिक हिंसाचारामध्ये दरवर्षी ४.५ लाख स्त्री-भ्रूणहत्या केल्या जातात, ८०% महिलांना छळाचा सामना करावा लागतो, २९% महिला शारीरिक हिंसाचाराला बळी पडतात आणि ६% महिलांवर बलात्कार होतो. तसेच, संधी नाकारणारा हिंसाचार म्हणजे सुरक्षिततेच्या नावाखाली ५०% महिलांना शिक्षण किंवा रोजगाराच्या संधी नाकारल्या जातात, असे आकडेवारीसह त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *