![]()
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामातील सहभाग कमी झाल्याचे सांगत “आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे,” असे विधान केले आहे. नागपुरातील काटोल येथे आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गा’च्या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. गडकरी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर गडकरींचं हे विधान समोर आल्याने त्याकडे वेगळ्या राजकीय अर्थाने पाहिले जात आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भविष्यातील राजकारणातील भूमिका आणि जबाबदाऱ्यांबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे आपल्या कामाच्या पद्धतीबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, “मी काही प्रेरणास्त्रोत नाहीये. आजकाल मी काही जास्त काम करू शकत नाही. ज्या वेळी करू शकलो तेव्हा केलं. आता माझाही कामातील सहभाग कमी झाला आहे. मी सर्वांना सांगितलं, नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे. नवीन लोक आले आहेत. जुने त्यांना मार्गदर्शन करत आहेत. हळूहळू पुन्हा काम वाढत आहे.” त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय अर्थ लावला जात असून, गडकरी यांनी भविष्यातील राजकीय आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांबाबत सूचक भाष्य केले का, याची चर्चा सुरू झाली आहे. पूर्वी समोसा खाऊन झोपायचो नितीन गडकरी यांनी आपल्या जुन्या जीवनशैलीचा किस्साही यावेळी सांगितला. “तरुणपणी माझं बेशिस्त आयुष्य होतं. पूर्वी पक्षाचं काम करताना समोसा खायचो आणि रात्री झोपून जायचो. मात्र, कोविडनंतर मी माझ्या आरोग्याची काळजी घेऊ लागलो,” असे त्यांनी सांगितले.“आता दररोज सकाळी उठल्यावर अडीच तास व्यायाम करतो. प्राणायाम करतो. माझा ट्रेनर आहे, तो माझ्याकडून व्यायाम करून घेतो. रोज सकाळी अर्धा तास व्यायाम आणि प्राणायाम करा,” असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला. तब्येत बिघडली तर सत्ता, संपत्तीचा काय उपयोग आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करताना गडकरी यांनी जीवनाच्या अनिश्चिततेवरही भाष्य केले. “तुमची तब्येत चांगली असेल तर उपयोग आहे. तब्येत बिघडली तर सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि ज्ञानाचा काय उपयोग आहे? इथे बसला आणि एका मिनिटात हार्टअटॅक आला तर काय येणार सोबत? गाडी नाही येणार, घोडा नाही येणार, बंगला नाही येणार. बायको नाही येणार आणि मुलं नाही येणार. कोणीच येणार नाही. खाली हात आला आहे, खाली हात जाणार आहे,” असे ते म्हणाले. लूना कू-कू करायची, स्कूटरवर चौघे जायचो गडकरी यांनी आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळातील आठवणीही यावेळी सांगितल्या. पक्षाचे काम करताना आपण सायकल आणि स्कूटरवरून प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले. “माझं आयुष्य इरेग्युलर आणि बेशिस्त होतं. माझ्या इतकं कुणाचंच आयुष्य इतकं बेशिस्त नसेल. भावनेच्या ओघात स्कूटरवर, सायकलवर जायचो. त्यावेळी एका व्यक्तीकडे अॅम्बेसिडर गाडी होती. पक्षाचे नेते विमानतळावर आले तर त्यांना येण्या-जाण्याची सोय व्हावी म्हणून आम्ही त्याला पक्षाचं अध्यक्ष बनवलं होतं,” असा किस्सा त्यांनी सांगितला. “माझ्याकडे लूना होती. ती कू-कू करायची. त्यावर डबल सीट जायचो. नंतर विजय स्कूटर आली. त्या स्कूटरवर आम्ही चौघे बसून जायचो. पोलिसांनी पकडू नये म्हणून नंबर प्लेटवर हात ठेवून जायचो,” असे गडकरी यांनी सांगितले. आदिवासी गावांमध्ये अंधार राहता कामा नये यावेळी नितीन गडकरी यांनी ‘एकलव्य एकल विद्यालय’ संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. राज्यातील आदिवासी भागातील गावांमध्ये शिक्षण आणि विकासाची प्रक्रिया अधिक व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी केले. “एक दिवस हे काम एवढं वाढेल की राज्यातील एकाही आदिवासी गावात अंधार राहणार नाही. प्रत्येक गावात उजेड होईल. त्यासाठी आपल्याला सर्वांनी मिळून काम करायचं आहे,” असे त्यांनी म्हटले. तसेच तरुणांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा विकास करण्यावर भर द्यावा, असेही गडकरी यांनी सांगितले. “मनातील गुणांची गुणवत्ता वाढवा. आपलं व्यक्तिमत्त्व गुणांच्या आधारे वजनदार बनवा. स्वतःचा विकास झाल्यानंतर गरीबांच्या विकासासाठी वेळ द्या. ज्यांच्या जीवनात अंधार आहे, त्यांच्या आयुष्यात उजेड आणण्याचं काम करा,” असे आवाहन त्यांनी केले. गडकरी यांच्या “आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे” या वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, त्यांनी हे वक्तव्य कोणत्या विशिष्ट राजकीय पदाच्या किंवा जबाबदारीच्या संदर्भात केले, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. हेही वाचा.. दररोज शाळेत जाताना मनात मृत्यूची भीती !:शाळकरी मुलांनी व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे रस्त्याची मागणी केली
पालघरमधील शाळकरी मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वैतरणा खाडीवर पूल उभारण्याची भावनिक मागणी केली आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी आणि स्थानिकांना जीव धोक्यात घालून धोकादायक मार्गाचा वापर करावा लागत असल्याने या मुलांनी थेट सरकारकडे पूल बांधण्याची विनंती केली आहे.सविस्तर वाचा..
Source link
आता जास्त काम करू शकत नाही:"नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे”; नितीन गडकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण