![]()
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) नागपूर शाखेने भ्रष्टाचाराविरुद्धच्या दोन महत्त्वाच्या खटल्यांमध्ये यश मिळवले आहे. विशेष न्यायालयाने दोन्ही प्रकरणांत दोषींना सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. या कडक निकालांमुळे शासकीय व निमशासकीय कार्यालयातील भ्रष्ट घटकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पहिल्या प्रकरणात, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सामग्री व्यवस्थापक अजय कुमार यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यांनी खरेदी आदेशाच्या मूल्याच्या ५ टक्के म्हणजेच १,०७,००० रुपयांची लाच मागितली होती. २३ ऑगस्ट २०१६ रोजी २०,००० रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. विशेष न्यायालयाने अजय कुमार यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ लाख रुपये दंड, तसेच कलम १३ (२) सह १३ (१) (ड) अन्वये ४ वर्षे सक्तमजुरी आणि ३ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दुसऱ्या प्रकरणात, वेकोलिमध्ये फसवणुकीचा घोटाळा उघडकीस आला होता. वेकोलिचे अधिकारी आणि खाजगी कंत्राटदारांनी संगनमत करून विहिरी खणण्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले होते. मात्र, ते काम नियमानुसार पूर्ण झाल्याचे खोटे कागदोपत्री दाखवून वेकोलिची ४,१०,२५० रुपयांची आर्थिक फसवणूक केली होती. या प्रकरणात, मुख्य आरोपीविरुद्धचा खटला अर्जावरील कार्यवाहीमुळे समाप्त झाला असला तरी, इतर दोन दोषींना न्यायालयाने कठोर शिक्षा ठोठावली. संजय भिवगडे यांना भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी प्रत्येकी ५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २ हजार ते ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याच गुन्ह्यातील दुसरे दोषी धनंजय रामलखन सिंह यांनाही आयपीसीच्या विविध कलमांनुसार ५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त साध्या शिक्षेची तरतूदही न्यायालयाने केली आहे. सीबीआयने सादर केलेल्या प्रभावी पुराव्यांमुळे आणि यशस्वी तपासामुळे हे दोन्ही महत्त्वाचे लाचखोरी व फसवणुकीचे खटले सिद्ध झाले, असे न्यायालयाने नमूद केले.
Source link
रेल्वे अधिकारी, वेकोलि फसवणुकीत दोघांना सक्तमजुरी:सीबीआय न्यायालयाने नागपूरमध्ये दोन महत्त्वाचे निकाल दिले