Headlines

पाचोडच्या रुग्णालयात फायर सेफ्टीचा बोजवारा:दोन वर्षांपासून ऑडिटच नाही, पाण्याचे मुख्य कनेक्शन तुटलेल्या अवस्थेत, प्रशासनाचे दुर्लक्ष‎




पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामीण रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीत आग आटोक्यात ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या चक्क रिकाम्या असून, या टाक्यांना जोडलेले पाण्याचे मुख्य कनेक्शनही तुटलेल्या अवस्थेत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समोर आले आहे. अत्यंत चिंतेची बाब म्हणजे या रुग्णालयाचे मागील दोन वर्षांपासून फायर ऑडिट झालेच नसल्याचे उघड झाले आहे. पाचोड ग्रामीण रुग्णालयात दररोज परिसरातील शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. आपत्कालीन परिस्थितीत आग विझवण्यासाठी अग्निसुरक्षा यंत्रणा सज्ज असणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, येथे मुख्य अग्निशमन यंत्रणेसाठी लागणाऱ्या टाक्यांमध्ये पाण्याचा थेंबही नाही आणि पाईप्स तुटलेले आहेत. त्यामुळे दुर्दैवाने आग लागल्यास ही यंत्रणा प्रत्यक्ष वेळी कितपत उपयोगी ठरेल, असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, पाचोड ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश नुकतेच प्राप्त झाले आहेत. एकीकडे रुग्णालयाचा विस्तार करण्याच्या हालचाली सुरू असताना, दुसरीकडे सध्याच्या इमारतीतील मूलभूत अग्निसुरक्षेची झालेली ही दुर्दशा अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. पाहणी करून सर्व त्रुटी दूर कराव्यात फायर ऑडिटद्वारे रुग्णालयातील अग्निशमन साधने, पाण्याची उपलब्धता, अग्निशामक उपकरणे आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग यांची नियमित तपासणी केली जाते. मात्र, येथे हे ऑडिटच झाले नसल्याने गंभीर रुग्ण, वृद्ध, गरोदर महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न संवेदनशील बनला आहे. अशी निष्काळजीपणाची अवस्था कायम राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून या सर्व त्रुटी दूर कराव्यात आणि अग्निसुरक्षा यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *