Headlines

जांबरगाव शिवारात बनावट डांबर निर्मिती:पत्र्याच्या शेडमध्ये थाटला कारखाना, अंधाराचा फायदा घेत संशयित पसार‎




समृद्धी महामार्गालगत पत्र्याच्या शेडआड सुरू असलेल्या बनावट डांबर तयार करण्याच्या कारखान्यावर वैजापूर पोलिसांनी धडक देत रॅकेटची पाळेमुळे उघड करण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांपूर्वी याच अड्ड्याची पोलखोल होऊन कारवाई झाली होती; मात्र त्यानंतरही येथे पुन्हा संशयित व्यवहार सुरू असल्याचा आरोप आहे. आता त्याच ठिकाणी पोलिसांना ८ ते ९ टन लोखंडी गजांचा साठा आणि विविध केमिकलने भरलेल्या २५ टाक्या आढळल्या आहेत. जालना जिल्ह्यातून समृद्धी महामार्गाने स्टीलचे गज घेऊन जाणाऱ्या काही ट्रकमधून चोरीने माल उतरवून या अड्ड्यावर खरेदी केला जात होता आणि पुढे तो काही व्यापारी व ठेकेदारांना कमी दरात विकला जात असल्याचा संशय आहे. बुधवारी मध्यरात्री एक वाजता प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी विनय सोनवणे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच तेथील काही मजूर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात गज आणि केमिकलच्या टाक्या या ठिकाणी कशासाठी होत्या, हा माल कुठून आला, तो कोण खरेदी करत होते आणि कारखान्यामागे कोणाचे पाठबळ आहे, याचा पोलिस माग काढत आहेत. गुरुवारी रात्रीपर्यंत जप्त मालाची मोजदाद सुरूच होती. या प्रकरणी वैजापूर ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू आहे. २०२४ मध्येही याच डांबर अड्ड्याची पोलखोल ४ मे २०२४ रोजी याच ठिकाणी मोठी कारवाई झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जिल्हा परिषद सदस्याने स्वतः केलेल्या गुप्त पाहणीनंतर हा अड्डा उजेडात आला होता. मात्र कारवाईनंतर अवघ्या आठ दिवसांत अड्डा पुन्हा सुरू झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे दोन वर्षे हा अड्डा नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू राहिला?, असा प्रश्न आता उपस्थित होत असून, त्या दिशने तपास होणे आवश्यक आहे. ट्रकचालक ते ठेकेदार; साखळी किती खोल? जालना जिल्ह्यातून स्टीलचे गज घेऊन जाणाऱ्या काही ट्रकमधून चोरीने गज उतरवून येथे खरेदी होत असल्याचा संशय आहे. पुढे हाच माल बाजारभावापेक्षा कमी दरात काही व्यापारी आणि ठेकेदारांना विकला जात असल्याची माहिती आहे. ट्रकचालक, व्यापारी, ठेकेदार अशी साखळी कार्यरत होती का, याचा शोध घ्यावा लागणार आहे. पंचनामा, मोजदादीची कारवाई सुरू घटनास्थळी जप्ती, पंचनामा आणि मालाच्या मोजदादीची कारवाई सुरू आहे. संपूर्ण कारवाई पूर्ण झाल्यानंतर जप्त मालाची मात्रा, किंमत आणि संबंधित व्यक्तींबाबत अधिकृत माहिती स्पष्ट करण्यात येईल असे वैजापूर पोलिसाकडून सांगण्यात आले. दरम्यान, २०२४ मध्येही या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. तरीही डांबर तयार करण्याचे काम सुरूच होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *