![]()
भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांकडून देशी बनावटीची तीन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ओंकार उर्फ बब्या संतोष पवार (वय १८, रा. तापकीर चाळ, आंबेगाव पठार, धनकवडी) आणि शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६, रा. श्री गणेश निवास, आंबेगाव पठार, धनकवडी) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगावमधील साईसिद्धी चौकात ओंकार पवार थांबला असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर, शिरीष खोपडे हा कात्रज डेअरी परिसरात थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याकडेही देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. पवार आणि खोपडे यांनी ही पिस्तुले का बाळगली होती, तसेच त्यांना ही शस्त्रे कोणी पुरवली, याबाबत भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत. ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष जाधव, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, रवी जाधव, सागर बोरगे, मितेश चोरमले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे, सोहम शेंडकर, तुकाराम सुतार, संदीप आगळे आणि मंगेश गायकवाड यांच्या पथकाने केली.
Source link
कात्रजमध्ये तीन पिस्तुले, चार काडतुसे जप्त:भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन सराईतांना केली अटक