![]()
पुण्यात अमली पदार्थ विरोधी कृती दलाने (एएनटीएफ) आंतरराष्ट्रीय मेफेड्रोन (एमडी) तस्करी साखळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सेनेगल आणि किंगडम ऑफ इस्वातिनीच्या नागरिकांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३६ ग्रॅम एमडी, आठ मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विक्रम कालेकर (३०, रा. कर्जत, जि. रायगड), सिसे सादिओ ऊर्फ अॅलेक्स (३०, सेनेगलचा नागरिक, रा. डोंबिवली) आणि जेले बियासमार्क (३०, किंगडम ऑफ इस्वातिनीचा नागरिक, रा. कर्जत) यांचा समावेश आहे. बाणेर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास करताना एएनटीएफच्या पथकाने ही कारवाई केली. यापूर्वी २६ जून रोजी याच गुन्ह्यात ९८ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर आणखी एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. पुढील तपासात या प्रकरणाचे धागेदोरे डोंबिवली आणि कर्जतपर्यंत पोहोचले. अटक आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील, मोबाईल क्रमांकांचे विश्लेषण आणि इतर तांत्रिक बाबींचा दोन महिन्यांहून अधिक काळ बारकाईने तपास करण्यात आला. या तपासातून अमली पदार्थ पुरवठा साखळीतील महत्त्वाचे दुवे पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर डोंबिवली आणि कर्जत परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. सिसे सादिओ याच्याकडून २२ ग्रॅम एमडी, आठ मोबाईल आणि एक लॅपटॉप, तर जेले बियासमार्क याच्याकडून १४ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. अमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या प्रमुख विशेष पोलिस महानिरीक्षक ज्योतीप्रिया सिंग आणि पोलिस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दोन्ही परदेशी नागरिक महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्या माध्यमातून एमडीचा पुरवठा कुठून होत होता, त्यांना अमली पदार्थ कोण पुरवत होते आणि पुण्यासह अन्य शहरांमध्ये त्याचे वितरण कोण करत होते, याचा शोध एएनटीएफकडून घेतला जात आहे. या कारवाईतून अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय साखळीतील आणखी आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक अथवा सेवनाची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे एएनटीएफकडून सांगण्यात आले आहे.
Source link
आंतरराष्ट्रीय एमडी तस्करीचा पर्दाफाश, परदेशी नागरिकांसह तिघे अटकेत:सेनेगल, इस्वातिनीच्या नागरिकांचा समावेश; एएनटीएफची कारवाई