Headlines

बनावट नोटांचे आमिष दाखवणारी टोळी जाळ्यात:वन्यजीव अवयव, अंमली पदार्थांसह 7.90 लाखांचा मुद्देमाल जप्त




नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी बनावट नोटांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य, वन्यजीवांचे अवयव आणि अंमली पदार्थांसह चार आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण 7 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 26 ऑगस्ट 2026 रोजी उमरेड शहरातील घटाळी रोड परिसरात काही व्यक्ती बनावट नोटांची विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मारुती स्विफ्ट कार (क्रमांक एचआर 06, एव्ही 6549) अडवून तिची पंचासमक्ष झडती घेतली. तपासणीदरम्यान, वाहनात कुलदीप कश्यप, मोहित नरेश कश्यप, गौरव राधेश्याम कश्यप (सर्व रा. हरियाणा) आणि एक महिला आरोपी आढळून आले. वाहनाच्या झडतीमध्ये 100 रुपयांच्या नोटांचे 6 बंडल (60,000 रुपये), 10 रुपयांच्या 99 नोटा, तसेच बनावट नोटा तयार करण्याचे कागद, काच, मशीन/लॉकर आणि केमिकल बाटल्या यांसारखे साहित्य सापडले. याशिवाय, एका पिशवीत काळविटाचे शिंग, हरणाचे शिंग आणि वाघाचे दात यांसारखे वन्यजीवांचे अवयवही आढळले. तसेच, 4.34 ग्रॅम वजनाचा, 21,700 रुपये किमतीचा अफू सदृश अंमली पदार्थही जप्त करण्यात आला. आरोपी नागरिकांना कमी रकमेच्या बदल्यात दुप्पट बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करत असत. नागरिकांकडून पैसे घेतल्यानंतर ते प्रत्यक्षात नोटा न देता पसार होत होते. या गुन्ह्यात उमरेड येथील अक्षय वसंतराव पाटील याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी वाहन, रोख रक्कम आणि अंमली पदार्थांसह एकूण 7,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपींविरुद्ध विविध कायदेशीर कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *