![]()
राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकाविरोधात लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून, आरोपी अंगरक्षक सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अजय सदाशिव सलामे आहे. पीडित महिलेने तक्रार केली आहे की, आरोपी सलामे याने तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक शोषण केले. तसेच, तिचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. लग्नास नकार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडित महिलेने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली तक्रार मांडली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर रामटेक पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे, आरोपी अजय सलामे यापूर्वी माजी खासदार कृपाल तुमाने यांचाही अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. या प्रकरणात मुख्य आरोपी सलामे याच्यासह अन्य एका महिलेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, रामटेक पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
Source link
राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकावर लैंगिक शोषणाचा गंभीर गुन्हा दाखल:नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप