Headlines

'कुंभमेळा बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव':विरोधकांच्या आरोपांवर CM देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ही त्यांची रणनीती




नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना प्रचंड वेग आला असून, हा महाउत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. याच अनुषंगाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वतः नाशिकमध्ये उपस्थित राहून सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. दरम्यान, विरोधकांकडून कुंभमेळाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवरून प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी फडणवीस म्हणाले, रोज प्रत्येकाने बोलायचे भ्रष्टाचार होतो, जेणेकरून कुंभमेळा बदनाम झाला पाहिजे, ही विरोधकांची एक प्रकारची रणनीती आहे. ज्याप्रमाणे राम मंदिरामध्ये जी काही घटना घडली, त्यानंतर जणू काही सर्व पैसे चोरीला गेले, 1800 कोटींपर्यंत आकडा पोहोचला. आता ही त्यांची स्ट्रॅटजी आहे की, ज्या ज्या ठिकाणी सनातन आणि हिंदू आस्था आहेत, त्या ठिकाणी अशा पद्धतीने आरोप करत राहायचे. खोटं बोलत राहायचं. लोकांच्या मनात संभ्रम तयार करत राहायचं. पण त्यांनी कितीही संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला तरी ये पब्लिक हें, सब जानती हें, असे फडणवीस यांनी म्हटले. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, कुंभाचे महत्व अध्यात्मिक अभिसरणाचे आहे. भक्ती संगमाची आपण सुरुवात केली आहे. 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण होईल, तारखांनुसार कार्यक्रम होतील. कुंभाची कामे वेगाने चालली आहेत. काही कामांमुळे लोकांना त्रास होतो आहे. संपूर्ण जनतेला अवगत गेले आहे. जनतेची क्षमा मागितली आहे, आमच्यात समन्वयाचा अभाव नाही, महानगर गॅसचे काम उशिरा झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र आता समस्या लवकर सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसर प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले, ज्याला मंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना मिश्किल टोला लगावत म्हटले की, नाशिकचे रस्ते आज टकाटक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिन्यातून एकदा नाशिकला यायला पाहिजे. आमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री मोटारीने नाशिकपर्यंत आले त्यांचे खूप खूप आभार. जागोजागी पोलिस पण थांबवले आहेत. अजिबात ट्रॅफिक देखील जाम होऊ देत नाहीत. इगतपुरीपासून नाशिकला येईपर्यंत हाडे खिळखिळा होतात, असा टोला भुजबळ यांनी लगावला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *