Headlines

वैजापूरला तिघांवर गुन्हा दाखल:जांबरगावच्या कारखान्यामधून 13 टन स्टील, 20 हजार लिटर केमिकल जप्त




समृद्धी महामार्गापासून काही अंतरावर जांबरगाव शिवारातील शेतात पत्र्याच्या शेडमध्ये नेमके काय सुरू होते, याचे गूढ वैजापूर पोलिसांच्या कारवाईनंतर अधिकच गडद झाले आहे. सुरुवातीला संशयित डांबर कारखाना म्हणून समोर आलेल्या या ठिकाणातून आता १३ टन चोरीचे लोखंडी स्टील आणि २० हजार लिटर केमिकलचा साठा बाहेर आला आहे. पोलिसांनी एकूण १२ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून भूषण पाटील (रा. पारोळा), अजय पाटील (रा. नाशिक) आणि शेतमालक सय्यद मासूक सय्यद नूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र कारवाईनंतरही या अड्ड्यामागील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. १३ टन स्टील नेमके कुठून चोरीला गेले? एवढा माल शेतातील अड्ड्यापर्यंत कुणी आणि कसा पोहोचवला? २० हजार लिटर केमिकल कुठून आले आणि त्याचा वापर नेमका कशासाठी होणार होता? विशेष म्हणजे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीत या ठिकाणी चोरीचे लोखंडी स्टील व डांबराचे केमिकल साठवल्याचा उल्लेख आहे. मात्र जप्तीच्या तपशिलात त्याची नोंद केवळ ‘केमिकल’ अशी आहे. पोलिसांनी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या १३ टन लोखंडी सळया जप्त केल्या असून त्यांची किंमत ६ लाख ५० हजार रुपये आहे. पोलिसांनी या स्टीलचा उल्लेख ‘चोरीचे’ असा केला आहे. मात्र हा माल नेमका कुठून चोरीला गेला, त्याचा मूळ मालक कोण, कोणत्या वाहनांतून तो जांबरगावपर्यंत आणण्यात आला आणि पुढे कुणाला विकला जाणार होता, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे या अड्ड्यामागे चोरीचा माल खरेदी-विक्री करणारी मोठी साखळी आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्ह्यातील भूषण पाटील हा पारोळ्याचा, अजय पाटील नाशिकचा, तर सय्यद मासूक सय्यद नूर हा संबंधित शेतमालक आहे. त्यामुळे पारोळा-नाशिक आणि जांबरगाव यांना जोडणारा व्यवहार नेमका कोणता होता, याकडेही लक्ष लागले आहे. चोरीचा माल आणणारे, तो साठवणारे आणि पुढे खरेदी करणारे वेगवेगळे आहेत का, याचा शोध घेण्यात येत आहे. छाप्यात २५ भरलेले बॅरल, नऊ रिकामे बॅरल आणि मोठ्या लोखंडी टाक्यांमध्ये केमिकलचा साठा आढळला. गोपनीय माहितीमध्ये ‘डांबराचे केमिकल’ असा उल्लेख आहे, तर जप्तीमध्ये ‘केमिकल’ अशी नोंद आहे. त्यामुळे हे द्रव्य नेमके कोणते, त्याचा स्रोत कोणता याचा उलगडा होणे महत्त्वाचे आहे. Ãचोरीचे लोखंडी स्टील आणि मोठ्या प्रमाणातील केमिकल जप्त करून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टील कुठून आले, त्याची वाहतूक व साठवणूक कशी झाली, केमिकलचे नेमके स्वरूप काय आहे आणि या प्रकरणात कुणाचा सहभाग आहे का, याचा सर्व दिशांनी तपास सुरू आहे. – विनय सोनावणे, प्रभारी अधिकारी, वैजापूर पोलिस ठाणे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *