Headlines

जात वैधता प्रमाणपत्र मिळेना; वैजापूरमध्ये टाकीवर आंदोलन:8 महिने उलटले तरी तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष‎




कुणबी जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आठ महिने उलटले, तरी प्रमाणपत्र हाती न पडल्याने वैजापूर तालुक्यातील खरज येथील उदय सोनवणे यांच्या कुटुंबातील चार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे. कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांना निर्धारित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना आहेत. वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्यास प्रवेश रद्द होण्याची भीती असल्याने संतप्त कुटुंबीयांनी शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास वैजापूर शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. सोनवणे कुटुंबातील चारही विद्यार्थ्यांनी जात वैधतेसाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र, आठ महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याने त्यांनी संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा केला. तरीही प्रमाणपत्र मिळाले नसल्याने आता थेट विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरच संकट निर्माण झाले आहे. या प्रकरणाची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंतही पोहोचली. त्यांनी सोनवणे कुटुंबीयांशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. मात्र, प्रश्न तातडीने मार्गी लागत नसल्याने अखेर कुटुंबीयांनी टाकीवर चढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा मार्ग स्वीकारला. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबीयांना खाली उतरण्याचे आवाहन करत त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर सोनवणे कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *