Headlines

मनोज जरांगे यांच्या उपोषणावर लक्ष्मण हाकेंची टीका:'शेवटचा लढा' म्हणत ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचा आरोप




मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणावर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र टीका केली आहे. जरांगे पाटील यांचे धोरण ‘शेवटचा लढा’ म्हणत ओबीसींच्या आरक्षणावर ‘घाला’ घालण्याचे असून, अपात्र प्रमाणपत्रे वैध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप हाके यांनी केला. या संदर्भात बोलताना हाके म्हणाले की, “शेवटचा लढा आणि ओबीसींचा आरक्षण गाडा” हेच मनोज जरांगे यांचे धोरण आहे. अपात्र प्रमाणपत्रे वैध करून घेण्याचा हा प्रयत्न असून, आता ओबीसी समाजाने एकत्र येण्याची वेळ आली आहे. आज ओबीसी एकत्र आले नाहीत, तर भविष्यात काहीही शिल्लक राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही, परंतु ते आरक्षण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्रपणे द्यावे, अशी ओबीसी समाजाची भूमिका असल्याचे हाके यांनी स्पष्ट केले. शासनाने या संदर्भात काढलेला शासन निर्णय बेकायदेशीर असून, त्या आधारे दिले जाणारे दाखले संविधान आणि कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोपही त्यांनी केला. हाके यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “हा निर्णय ओबीसींच्या आरक्षणाच्या अंगणात माती कालवणारा आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाबाबत गंभीर भूमिका घेतलेली नाही. ओबीसींचे आरक्षण मातीत मिळवण्याचे काम महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांनी केले आहे.” मुख्यमंत्री आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना हाके म्हणाले की, मागासवर्गीय समाजाला न्याय मिळणार नसेल, तर त्यांनी जायचे कुठे? सरकारने ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडले आहे. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकार पार पाडताना दिसत नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी १ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली. हे आंदोलन कोणत्याही आमदार, खासदार किंवा राजकीय नेत्याच्या भरवशावर नसून, सामान्य ओबीसी बांधवांच्या सहभागातून उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले. “आपले आरक्षण वाचवायचे असेल, तर ओबीसी बांधवांनी स्वतः रस्त्यावर उतरले पाहिजे. आता समाजाने एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची गरज आहे,” असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *