![]()
अमरावतीतील शासकीय स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीच्या भीषण दुर्घटनेत तीन चिमुकल्यांचा बळी गेल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तिथे भेटी देण्यास सुरुवात केली आहे. भाजप आमदार चित्रा वाघ यांनीही रुग्णालयाची पाहणी केली असता, तेथील असुविधांवरून प्रशासनाला खडे बोल सुनावत ‘तुमच्यामुळे सरकार बदनाम होत आहे,’ असा संताप व्यक्त केला. त्यांच्या या दौऱ्यानंतर, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयात केवळ भेटी देऊन राजकारण करणाऱ्या नेत्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे. याशोमती ठाकूर म्हणाल्या, या सरकारची काय नाटकं सुरू आहेत हे समजत नाही. पर्यटनासारखं दवाखान्यात येत आहेत आणि तमाशा जास्त करत आहेत. कुठेही सरकार काम करत नाही. सरकारचा धाक याठिकाणी राहिलेला नाही, असे म्हणत ठाकूर यांनी चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर टीका केली आहे. पुढे बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अजूनपर्यंत पोहोचले नाहीत, त्यांचा पाणीपुरी खाण्याचा व्हिडिओ त्याठिकाणी येतो. हनुमान गढीला 121 कोटी दिले, पण 9 कोटी रुपये जिल्हा स्त्री रुग्णालयाल दिले नाहीत. इथे येऊन उगाच नाटकं, आरडाओरडा बंद करा. रोज कोणी हीरो हिरोईनसारखं, कोणी लोकप्रतिनिधी येणार, सरकार काम करत आहे हे सांगणार, पण सरकारचे अमरावतीकडे दुर्लक्ष आहे, ही वास्तविकता असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. दोषींना पोलिस चौकशी करून निलंबित करा- चित्रा वाघ रुग्णालयाला भेट दिल्यानंतर आमदार चित्रा वाघ यांनी जिल्हाधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आगीच्या घटनेबाबत चर्चा केली. भंडारा दुर्घटनेनंतर फायर ऑडिटचे स्पष्ट आदेश असतानाही प्रशासनात ताळमेळ नसल्याचे त्यांनी उघड केले. “25 जून रोजी पहिलं पत्र दिलं, 30 जून आणि 22 ऑगस्ट रोजी आम्ही व्हिजिट केली असे PWD वाले म्हणताय. पण, वैद्यकीय अधिकारी म्हणतात याठिकाणी कोणीच आले नाही,” असा गोंधळ उघडकीस आणत कोणीतरी अधिकारी नक्कीच खोटं बोलत असून जिल्हाधिकाऱ्यांनीही ते मान्य केल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले. या भयानक निष्काळजीपणामुळे तीन नवजात बालकांचा नाहक जीव गेला आहे. त्यामुळे या प्रकरणावर कठोर भूमिका मांडताना त्या म्हणाल्या की, “आता शासनाने समिती नेमली आहे.. त्यात दोषी कोण आहे ते कळेल, पण यात पोलिस चौकशी लागणे आवश्यक आहे. यात चूक झालेली आहे, जे जे दोषी असेल ते निलंबित झाले पाहिजे, त्यांना माफी नाही,” असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. चित्रा वाघ यांच्याकडून सरकारची पाठराखण ‘एएफ इलेक्ट्रिक’ कंपनीची वायर उत्तम असल्याचे म्हटले जात असतानाही ही दुर्घटना कशी घडली, असा सवाल उपस्थित करत 400 खाटांच्या या रुग्णालयाचे फायर ऑडिट होणे अत्यंत आवश्यक असल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. तसेच, कोणत्याही डॉक्टरांनी आम्हाला ‘शिलर’ कंपनीचे किंवा इतर कोणतेही व्हेंटिलेटर नको असे लेखी दिलेले नाही. त्यामुळे सरकारने ते सक्तीने दिले हा आरोप फेटाळून लावत त्यांनी सरकारची बाजू सावरली. दुर्घटना घडल्यापासून पालकमंत्री सतत यंत्रणेच्या संपर्कात असून, रुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे 36 बालकांचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, इतर तीन नवजात बालकांनाही खासगी रुग्णालयातून सुखरूप डिस्चार्ज मिळाला असून त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Source link
'रुग्णालयात पर्यटनासारखे येऊ नका, तमाशा बंद करा':चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या; मंत्री बावनकुळेंवरही निशाणा