Headlines

पावसाची दडी, बळीराजा संकटात!:हातातोंडाशी आलेला घास गेला वाया; शेतकऱ्याने 10 एकर सोयाबीनवर फिरवला नांगर




राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके करपायला सुरुवात झाली असून परभणी जिल्ह्यातही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने मोठा खंड दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथे एका शेतकरी महिलेने पावसाअभावी वाळून चाललेल्या तब्बल 10 एकर सोयाबीन पिकावर नांगर फिरवला आहे. मंगलबाई दत्तराव हिक्के असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी मोठ्या मेहनतीने व खर्चाने सोयाबीनची लागवड केली होती. मात्र, ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाने दडी मारल्याने पीक पूर्णपणे वाळून गेले, ज्यामुळे त्यांना उभ्या पिकावर नांगर फिरवण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. मोठे आर्थिक नुकसान बियाणांची खरेदी, खते आणि मजुरी असा मोठा खर्च करूनही पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आवश्यक ओलावा मिळाला नाही. पिकाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत गेल्याने उत्पादनाची उरलीसुरली आशाही मावळली. लागवडीसाठी केलेला खर्च वाया गेल्याने आणि उत्पन्न बुडाल्याने शेतकऱ्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासकीय मदतीची अपेक्षा केवळ एका शेतकऱ्याचीच नव्हे, तर परभणी जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. डोळ्यांसमोर उभे पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नैसर्गिक संकटात सापडलेल्या या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने दिलासा द्यावा आणि नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर पावसाळा सुरू होऊन तब्बल तीन महिने उलटून गेले असले तरी, राज्याच्या अनेक भागांत अद्यापही पावसाचा पत्ता नाही. यामुळे केवळ खरीपाची पिकेच वाया जात नाहीत, तर ग्रामीण भागात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्नही अत्यंत गंभीर रूप धारण करत आहे. पावसाळ्याच्या दिवसांतच दुष्काळी परिस्थितीच्या झळा जाणवू लागल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *