Headlines

गांधी-विनोबांच्या भूमीत आता पुस्तकांची नगरी:वर्धा ठरणार राज्यातील पहिले पुस्तकांचे शहर!




राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमी वर्ध्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. वर्धा शहर राज्यातील पहिले पुस्तकांचे शहर म्हणून विकसित करण्यात येणार असून, शहरातील ग्रंथालयांसाठी तब्बल ३५ हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे वर्ध्यातील वाचनसंस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे, अशी घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी मराठी भाषा विभागाचा आढावा व साहित्यिकांशी संवाद कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्यासह जिल्ह्यातील साहित्यिक उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी वर्ध्याला पुस्तकांचे शहर करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. सामंत यांनी वर्ध्याची राज्यातील पहिले पुस्तकांचे शहर म्हणून निवड केली. शहरातील विविध ग्रंथालयांना ३५ हजार पुस्तके उपलब्ध झाल्याने विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि वाचकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. मराठी भाषेच्या शासकीय कामकाजाला अधिक गती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वर्ग-१ दर्जाचा स्वतंत्र मराठी भाषा अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. मराठीला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लंडनमधील ऐतिहासिक इमारतीत आंतरराष्ट्रीय मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची साहित्यिक ओळख जपण्यासाठी कवितांचे गाव संकल्पनाही राबविली जाणार आहे. ग्रामीण व नवोदित साहित्यिकांचे दर्जेदार अप्रकाशित साहित्य प्रकाशित करून शासनामार्फत पुस्तके खरेदी करून ती ग्रंथालयांपर्यंत पोहोचविली जाणार आहेत. त्यामुळे नवोदित लेखकांना मोठे व्यासपीठ मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *